
कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पात तब्बल १७६ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून बिल्डर श्रीकांत शितोळे यांच्यासह चेतन सराफ, महेश गोसावी आणि इतरांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘टायकुन गोल्ड एव्हेन्यू’ या पुनर्विकास प्रकल्पाचे काम २०२२पासून बंद असून सोसायटीची जमीन बँकेकडे गहाण ठेवून रहिवासी तसेच शेकडो सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
चिकणघर येथील सर्व्हे क्रमांक २२ मधील म्हाडाच्या एमआयजी योजनेतील शांतिदूत सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडच्या पुनर्विकासाचे काम टायकुन अवंती प्रोजेक्ट्स एलएलपी या विकासक संस्थेकडे सोपविण्यात आले होते. हा प्रकल्प टायकुन रियल्टीज एलएलपी आणि सिकॉम रियल्टी लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील फिर्यादी नंदा म्हात्रे (रा. फ्लॉवर व्हॅली, कल्याण) यांनी २९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकल्पातील ‘ए’ विंगमधील ११व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११०१साठी ३९ लाख ३६ हजार ६९ रुपये भरल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित सदनिकेचा ताबा जुलै २०२५ पर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र निर्धारित मुदत उलटूनही सदनिकेचा ताबा मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शांतिदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेतील १८४ सदस्यांसह इतर शेकडो फ्लॅट खरेदीदारांकडून मिळून १७६ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम स्वीकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चार वर्षापासून काम बंद
विकासकांनी प्रकल्पाचे बांधकाम केवळ दहाव्या मजल्यापर्यंत केले असून त्यानंतर काम बंद पडले. २०२२पासून प्रकल्पाचे काम पूर्णपणे ठप्प आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





























































