
तीन दिवस झाले तरी मोबाईल फोन दुरुस्त न केल्याने संतापलेला ग्राहक थेट तलवार घेऊन दुकानात पोहचला. तलवारीचा धाक दाखवत त्याने दुकानदाराला धमकावले. या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्यात आले असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागपूरच्या पारडी परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. सूरज वाघमारे असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सूरजने त्याचा मोबाईल फोन पारडी परिसरातील पवन घुमदे यांच्या दुकानात दुरुस्तीसाठी दिला होता. तीन दिवस उलटून गेले, पण दुरुस्ती झाली नव्हती. आपला मोबाईल फोन परत न मिळाल्याने तो ग्राहक संतापला आणि त्यामुळे हा वाद वाढला. यानंतर सूरज तलवार घेऊन दुकानात आला आणि त्याने दुकानदाराला धमकी दिली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. परडी पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीने तलवार कुठून मिळवली, याबाबतही पोलीस तपास करत आहेत.




























































