व्होट चोर, गद्दी छोड… तरुणाईचा संताप, झुरळांचे वादळ पुन्हा धडकले! लोकशाही रक्षणाचा लढा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक घोटाळ्याचे कारस्थान रचणाऱ्या भाजप सरकारविरोधात शुक्रवारी तरुणाईने संताप व्यक्त केला. हातामध्ये देशाचा तिरंगा फडकावत लोकशाहीच्या रक्षणासाठी झुरळांचे वादळ दादरमध्ये धडकले. शिवसेना भवनपासून ते छत्रपती शिवाजी महाराज मैदानापर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी उसळली. तरुणाईने लोकशाहीच्या रक्षणाचे नारे दिले. ‘व्होट चोर गद्दी छोड…’, ‘कशाला करतोस सतरा लफडी, ज्ञानू सोडून दे अफरातफरी’, ‘ज्ञानू काका मुर्दाबाद’ असे फलक तरुणाईने झळकावले. ‘ये तो सिर्फ झांकी है, बहुत पुछ बाकी है’, असा इशाराच यावेळी देण्यात आला.

‘नीट’ पेपरफुटीविरुद्ध सीजेपीने पुकारलेल्या आंदोलनाला दोन महिने उलटल्यानंतर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारनाम्याविरोधात जेन झी एकवटले होते. गद्दार निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच देशभरातून जेन झी एकवटले होते. या आंदोलनाला सरकारने परवानगी नाकारली होती. मात्र त्यानंतरही तरुणाईने उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होत भाजप सरकारलाच थेट आव्हान दिले. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, एसआयएफ यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी रस्त्यावर ठिकठिकाणी ‘जलसा’ सादर केले. बहुतांश तरुण-तरुणींनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचे छायाचित्र असलेली टी-शर्ट परिधान केली होती, तर अनेकांनी राष्ट्राभिमान व्यक्त करणारा संदेश देत टोप्या परिधान केल्या होत्या. काहींनी ज्ञानेश कुमारचे मुखवटे परिधान करून ‘या गद्दारा’ला हटवण्याची मागणी लावून धरली. काहींच्या हातातील फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि त्याला ज्ञानेश कुमार यांचा मुखवटा परिधान केला होता. निवडणूक घोटाळ्यामागे हेच कारस्थानी असल्याचे म्हणणे पुणे येथील साहिल दिवेकर याने मांडले. ‘व्होट चोर व्होट चोर… मोदी चोर है, मोदी की चोरी पकडी गई है’, ‘एक दो एक दो ज्ञानेश कुमार को फेक दो’ अशीही घोषणाबाजी तरुणांच्या ग्रुपमधून देण्यात आली.

आंदोलकांनी देवेंद्र फडणवीसांना ठणकावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात सहभागी व्हाल तर तीन दिवस जेलमध्ये जाल, असा इशारा दिला होता. त्याला सीजेपी आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी तगडे प्रत्युत्तर दिले. तीन दिवस काय… तीन महिने जेलमध्ये जाऊ, इतकेच नव्हे तर तीन वर्षेही जेलमध्ये टाकलात तरी जेलमधून बाहेर पडल्यानंतरही हाच आवाज आम्ही उठवत राहू, असे आंदोलकांच्या प्रतिनिधींनी सरकारला ठणकावले. आंदोलनामध्ये 15-16 वर्षांची मुलेही सहभागी झाली होती. पुण्यातील 16 वर्षीय अनुष्काने लोकशाही जिवंत राहिलीच पाहिजे. यासाठी सरकारच्या कुठल्याच दडपशाहीची तमा बाळगणार नसल्याचे भाषणात सांगितले.

भाजपला मतदान नकोच…!

वडील आणि आजोबांनी 70 वर्षांपासून भाजपला मतदान का नाही केले हे आता दिसत आहे. अशा आशयाचा बॅनर आंदोलनातील एका तरुणाने झळकावला होता.

आमचे मत, आमचा अधिकार

मतदान हा आपला आवाज आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण जेव्हा आपला हा अधिकार हिरावून घेतला जातो, मतदार याद्यांमधून आपली नावे वगळली जातात तेव्हा आपण काय करणार? लोकशाही टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हा आपला अधिकार आहे,’ असे ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यावेळी म्हणाल्या.

नसीरुद्दीन शाहांना पाहून दीपके भावूक

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी शिवाजी पार्कातील आंदोलन स्थळी भेट देऊन काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांची गळाभेट घेतली. यावेळी दीपके यांनी त्यांना स्टेजवर पाहून आश्चर्य व्यक्त केले. मी स्वप्न तर पाहत नाही ना, असा प्रश्न विचारत त्यांनी नसीरुद्दीन शाह यांचे आभार मानले. मला जराही कल्पना नव्हती की तुम्ही या ठिकाणी याल. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, असेही दीपके यांनी यावेळी सांगितले.

ददलानी यांची घोषणा व्हायरल

मुंबईतील आजच्या काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात विशाल ददलानी हे सहभागी झाले होते. त्यांनी स्टेजवर येऊन ‘गो ज्ञानू गो’ ही घोषणा दिली. सोशल मीडियावर या आंदोलनाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. दिल्लीतील आंदोलनात सहभागी होता आले नव्हते, त्यामुळे मुंबईतील आंदोलनात सहभागी झालो, असे ददलानी यांनी यावेळी सांगितले. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी म्हटले.

ग्यानु तो गीयो…

‘धर्मेंद्र प्रधान झांकी है…ज्ञानेश कुमार अभी बाकी है’, ‘ग्यानू तो गियो’, ‘ग्यानू तुझा लोकशाहीवर भरोसा नाय काय?’, ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा तरुणाईने केल्या.

आंदोलनात तरुणीदेखील मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. एक चाय, दो खारी, ग्यानू अब तेरी बारी, एक जिरा, दोन अजवाईन… ज्ञानेश कुमार दो रिजाईन… अशा घोषणांनी त्यांनी आसमंत दणाणून सोडला.

शिवाजी पार्कात तरुणांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांच्या हातात तिरंगा ध्वज होता. तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली.  सकाळपासून आंदोलक शिवाजी पार्पवर धडकले. कोणालाही त्रास झाल्यास त्यांना तत्काळ उपचार मिळावे यासाठी नवी मुंबईतील डॉ. नितीन दिघे व खोपोली येथील डॉ. पठाण हे आंदोलनाच्या ठिकाणी प्रथमोपचाराचे साहित्य घेऊन तैनात होते. ही वैद्यकीय सेवा स्वखर्चाने स्वयंप्रेरणेने ते करत होते.

आंदोलनाला जेन झीसोबत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीदेखील हजेरी लावली होती. ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी तरुणांच्या स्टाईलने हटके पोस्टर झळकावत सर्वांचे लक्ष वेधले.

आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणीने काॅक्रोचला घाबरून पंतप्रधान मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पळ काढताना दिसत आहेत अशा आशयाचे पोस्टर झळकावले.

घरचं जेवण घेऊन आलोय…

काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला बाहेरून फंडिंग केले जाते, अशी टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. मात्र, आंदोलनात सहभागी झालेले काही तरुण घरूनच जेवणाचा डबा घेऊन आले होते. आंदोलनापूर्वी रस्त्यावर बसूनच त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. ‘आम्हाला कोणीही फंडिंग करत नाही, घरचं जेवण घेऊन आलोय,’ असे जोरदार प्रत्युत्तर त्यांनी टीकाकारांना दिले.

आमचा वारसा…

आंदोलनात आलेल्या एका आंदोलकाच्या हातातील पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले. ‘आमचा वारसा’ असे या पोस्टरवर लिहिले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, संत तुकाराम, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, संत गाडगेबाबा यांचा फोटो दिसत होता. महापुरुषांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर घेऊन तरुणाईने एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला.