वारसावैभव – सटवाई ते महासरस्वती…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सागर मुंढे

भूम येथील माणकेश्वर मंदिर परिसरातील सटवाई देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्यात आला अन् ही सटवाई देवी नसून महासरस्वती असल्याचे समोर आले. 

ही घटना आहे राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील भूम या तालुक्यात स्थित असलेल्या माणकेश्वर गावातील. मुळातच गावामध्ये एक प्राचीन भव्य चालुक्य काळातील दगडी वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेले श्री माणकेश्वर शिव मंदिर आहे. प्राचीन मंदिराच्या आवारात राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या माणकेश्वर मंदिराच्या जागेतच सटवाई देवीचे मंदिर आहे. अगदी प्राचीन मंदिराला लागून डावीकडे नदीच्या किनारी नव्याने उभारलेले आहे.

मंदिराच्या आतमध्ये आधुनिक बांधकाम केलेले सभामंडप आणि एक गर्भगृह आहे. गर्भगृहात एक दगडी चार खांबी कमानयुक्त चौथऱयावर सटवाई नावाची देवी आसनस्थ आहे. सध्या राज्य पुरातत्व विभाग संभाजीनगर विभागाच्या कार्यालयाने कायदेशीर आदेशाने देवीच्या मूर्तीवरील विद्रूप शेंदूर काढला आहे. त्यामुळे ही सटवाई देवी नसून ती साक्षात महासरस्वती असल्याचे समोर आले. एवढी वर्षे येथे ही देवता सटवाई म्हणून सुप्रसिद्ध झाली आहे की या देवीची येथे यात्रा भरते. त्यामुळे तालुक्यासहित राज्यात याबद्दल मोठय़ा प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली आहे.

माणकेश्वर गावात याबाबत दोन गट होते. एका गटाने राज्य पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करून संबंधित मूर्तीला शेंदूर लावून झालेल्या विद्रूप अवस्थेपासून मूर्तीची सुटका करावी अशी मागणी केली. त्यांचे म्हणणे होते की, प्राचीन सुंदर मूर्तीवर शेंदूर लावल्याने मूळ देवतेचे दर्शन होत नाही. तसेच मूर्ती शास्त्राrय दृष्टीने महत्त्वाची व वारसा असलेली असताना अशा मूर्तीवर कोणी एकाधिकार दाखवू शकत नसल्याचे म्हणणे मांडले. त्यामुळे सर्वांसाठी मूर्ती दर्शनासाठी मोकळी करावी व तिचे शास्त्रीय पद्धतीने जतन आणि संवर्धन करावे अशी विनंती करण्यात आली. तर दुसऱया गटाने याला पूर्णपणे विरोध केला. भक्तांच्या भावनांचा अपमान करू नका व देवता आहे तशीच राहावी यासाठी पुरातत्व विभागाकडे मागणी केली. दोन्ही बाजूंचे पत्रव्यवहार लक्षात घेऊन पुरातत्व विभाग, संभाजीनगर यांच्याकडून मूर्ती अभ्यासक व मूर्ती संवर्धक यांच्या माध्यमातून मूर्तींची पाहणी करण्यात आली. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेअंती सर्व ग्रामस्थ व दोन्ही गट मूर्तीवरील शेंदूर कार्यासाठी तयार झाले.

मूर्ती तज्ञ व मूर्ती संवर्धक पारंगत यांनी सलग तीन दिवस मूर्तीचे जतन व संवर्धनाच्या दृष्टीने कार्यवाही सुरु केली. प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर देवतेचे संपूर्ण शेंदूर काढण्यात आले. त्यानंतर मूर्तीवरील सिमेंटचा जाड व विद्रूप थर काढण्यात आला. देवीचे मागील दोन्ही हात तुटलेले होते त्या जागी दगड गोटे व सिमेंट लावून घट्ट थर करण्यात आला होता. त्यामुळे या मूर्तीचे खरे रूप लक्षात येत नव्हते. रासायनिक पद्धतीने देवीच्या मूर्तीवरील संपूर्ण शेंदूर, सिमेंट थर काढून मूर्ती पूर्णपणे मोकळी करण्यात आली. त्यानंतर मूर्तीचे अवयव, आयुधे व स्वरूप लक्षात आले. मूर्तीचे मागील दोन्ही हात नसल्याने मूर्ती अभ्यासक व विशेष संशोधकांच्या मदतीने ओळख पटवून हे दोन्ही हात बनविण्यात आले. यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशमधील काही मंदिरांवरील सरस्वती देवतांच्या मूर्तीचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर रेखाचित्रे तयार करून प्रत्यक्ष मूर्ती वज्रलेप करून पूर्ण करण्यात आली. यामुळे मूर्तीला मूळ स्वरूप प्राप्त झाले. मूर्तीच्या विविध भागांवर आवश्यकतेनुसार वज्रलेप करून रासायनिक आवरण करून मूर्तीचे कायमस्वरूपी जतन व संवर्धन करण्यात आले. सदर मूर्ती महासरस्वती असल्याचा निष्कर्ष मूर्ती तज्ञ व संशोधकांनी काढला असून ही सटवाई नसल्याचे सिद्ध झाले. त्याप्रमाणे अहवाल पुरातत्व विभागाकडून जाहीर करण्यात आला.

ही महासरस्वती मूर्ती आसनस्थ असून चतुर्भूज आहे. देवीच्या डाव्या बाजूला आसनाजवळ मोर हे वाहन कोरलेले आहे. उजव्या पुढील हातात अक्षमाला व अभयमुद्रा असून मागील उजव्या हातात अंकुश, डाव्या मागील हातात वीणा तर डाव्या पुढील हातात वेद पुस्तिका आहेत. मागील प्रभावळ मकर तोरणाने युक्त असून मधोमध कीर्तिमुख कोरलेले आहे. आभूषणांचे अतिशय नाजूक नक्षीकाम कोरलेले असून शारीरिक ठेवण अतिशय देखणी आहे.

सटवाई व लोक परंपरा

येथील स्थानिक लोक मागील अनेक वर्षांपासून या देवतेला सटवाई म्हणून पूजतात. त्यामुळे या परिसरात हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. भूम, परांडा, धाराशिव, सोलापूर वगैरे ग्रामीण भागातून अनेक भाविक लहान मुलांच्या जावळ (केस काढण्याचा विधी)साठी येथे येत असतात. त्या व्यतिरिक्त भक्त देवीच्या नावाने अनेक बोकड व बकरे कापून देवीला नैवेद्याच्या नावाखाली ढर प्रथा चालते. जावळ, नवस, मांसाहार जेवण, पूजा साहित्य दुकाने अशी सर्व रेलचेल येथे रोज चालू असते. देवीचा मंगळवार असतो त्या दिवशी भाविक भक्तांची रोजच्यापेक्षा जास्त गर्दी असते. स्थानिकांनी सदर सटवाई देवतेची लोकदेवता म्हणून जरी स्वीकृती केली असली तरी आता जतन-संवर्धन झाल्यानंतर मूर्तीचे मूळ स्वरूप महासरस्वती असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे येथील मांसाहार व चुकीचे धार्मिक क्रियाकलाप यांना नक्कीच चाप बसणार आहे. यामुळे स्थानिक धार्मिक देवतांसंदर्भात असलेली श्रद्धा व विश्वास यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरीही स्थानिकांनी व भक्तांनी देवीच्या या मूळ रूपाचे स्वागत केले आहे.

महासरस्वती देवता आपल्या गावात असून सरस्वतीची ठिकाणे दुर्मिळ असल्याने स्थानिक भाविकांनी व ग्रामस्थांनी आनंदाने ही बाब स्वीकारलेली असल्याने पुरातत्व विभागानेदेखील समाधान व्यक्त केले आहे. आता प्रश्न उरतो तो हा की, आजपर्यंत इथे पुजली जाणारी सटवाई देवी प्रत्यक्ष महासरस्वती असल्याने सटवाई देवीचे भक्त काय भूमिका स्वीकारतात हे पाहणे गरजेचे आहे. या आधीदेखील माणकेश्वर मंदिरावर एक पत्रलेखिका म्हणून असलेली सूरसुंदरी जिला शेंदूर लावून विद्रूप केले होते व सटवाई म्हणून प्रसिद्ध केले होते. पुरातत्व विभागाने कारवाई करत यावरील शेंदूर काढून मूळ मूर्तीला मोकळे केले आहे व ती सटवाई नसून सूरसुंदरी आहे असे जाहीर केले आहे.

माणकेश्वर मंदिर परिसरातील सटवाई आता सरस्वती म्हणून समोर आल्याने याचे परिणाम चांगल्या पद्धतीने होत असल्याचे दिसत आहे. देवतेच्या मूर्तीवरील शेंदूर काढल्यानंतर मूळ मूर्तीचे स्वरूप पाहून स्थानिक स्वेच्छेने मूळ देवता मूर्तीच्या जतन-संवर्धनासाठी ग्रामस्तरावर एकत्र येत आहेत. इतरही गावांतील देवतांसाठी हे आदर्श उदाहरण ठरणार आहे. हा सकारात्मक परिणाम वारसा जपण्याच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊलच म्हणावे लागेल.
(लेखक पुरातत्व संशोधक असून या प्रकल्पातील ‘कन्झर्व्हेटर’ आहेत.)