
>> प्रा. समीर जाधव
समर्थ संप्रदयातील अफाट ग्रंथसंपदा अजूनही तंजावरमधील सरस्वती महाल ग्रंथालयाच्या कपाटात हस्तलिखिताच्या स्वरूपात बंदिस्त आहे. त्याविषयी…
कावेरी खोऱ्यातील समर्थ संप्रदाय’ या मागील लेखात आपण तंजावरमध्ये समर्थ संप्रदायाची सुरुवात कधी झाली आणि तंजावरमध्ये समर्थ संप्रदायचे नेमके स्वरूप कसे होते याचा विचार केला. आजच्या लेखात तंजावरमध्ये समर्थ संप्रदायाच्या माध्यमातून जी अफाट ग्रंथ संपदा निर्माण झाली त्या रामदासी साहित्याचा आढावा घेणार आहोत.
तंजावरच्या सर्वच रामदासी मठात रामनवमीच्या उत्सवप्रसंगी मठप्रमुख कीर्तन करीत असे. कीर्तनात ‘सीताकल्याणा’चे आख्यान सादर होत असे. राम-लक्ष्मण-सीता, त्राटिका, रावण, विश्वामित्र यांच्या प्रतिमा अगदी हुबेहूब उभ्या केल्या जात. रामसीतेचे लग्न खऱ्याखुऱ्या लग्नासारखे लावले जात असे. आज फक्त भीमस्वामी मठात मठाचे प्रमुख रामचंद्र केसकर कीर्तनाचा काही अंश सादर करतात. रामनवमी, हनुमान जयंती, चैत्रगौरीचे हळदीकुंकू, त्यानिमित्त डाळ-पन्हे, चंदन लावणे या सर्व प्रथा पूर्वीपासून आजतागायत रामदासी मठांत चालू असलेल्या दिसतात.आजही तंजावरमधील प्रत्येक रामदासी मठात, दासबोधाचे हस्तलिखित, झोळी, झेंडा, कफनी, मेखला, कुबडी, पादुका इत्यादी वस्तू आहेत. त्याचबरोबर रामदासी पंथातील कवींनी निर्माण केलेल्या ग्रंथांची हस्तलिखितंही उपलब्ध आहेत.
तंजावरमधील अनेक कवी हे समर्थ संप्रदायाचे अनुयायी होते. महाराष्ट्रात जेवढी समर्थ संप्रदायात साहित्य निर्मिती झाली त्यापेक्षा कैकपट जास्त समर्थ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी साहित्य निर्मिती ही तंजावरमध्ये झाली. अनंतमौनीस्वामी यांचे शिष्य मेरूस्वामी यांनी मोलाची आणि महत्त्वाची साहित्य निर्मिती केली. आपल्या गुरूप्रमाणेच मेरूस्वामी वेदशास्त्रसंपन्न होते हे त्यांच्या ग्रंथावरूनच लक्षात येते. त्याशिवाय ते एक चांगले चित्रकारदेखील होते. मेरूस्वामींनी काढलेले समर्थांचे चित्र ही मेरूस्वामींची समर्थ संप्रदायाला देणगी आहे. त्यांनी काढलेल्या समर्थांच्या चित्राचा प्रसार समर्थ संप्रदायाने खूप मोठय़ा प्रमाणात केला आहे व ते अधिकृत देखील मानले गेले आहे. मेरूस्वामींची ग्रंथरचना पुढील प्रमाणे : रामसोहळा, भीमोपदेश, आत्मसाक्षात्कार, भगवद्गीता, स्वानंदलहरी, मानसपूजा, अनुभवसार, मेरूबोध, तत्त्वपट, पूर्णामृतकर षोडशकला, समर्थाष्टक, श्रीरामपंचरत्नमालिका, संतमाला, अवधूतगीता, रामदास स्तवन, अनंतवाल्मिकी रामायण. या ग्रंथाबरोबरच मेरूस्वामी यांनी त्रिस्थळी यात्रा वर्णन, श्रीराम आरती, मारुती आरती, अनंत सद्गुरु आरती, गुरु पद, दासबोध व श्रीसमर्थांची आरती, रामाचा पाळणा अशी पदरचनाही केली आहे. ?
मेरूस्वामींनी महाराष्ट्रापासून दूर राहून भिन्नभाषिक प्रांतात रामोपासनेचा प्रचार करून, मराठी भाषेत विपुल ग्रंथनिर्मिती केली. तसेच मठ स्थापना करीत रामोपासनेचे केंद्र निर्माण करून समर्थ संप्रदायाची ज्योत तेवत ठेवली. प्रतापसिंह राजे भोसले यांनी मेरूस्वामींकडून दीक्षा घेतली. मेरूस्वामी यांनी त्यांचे ‘प्रतापराम’ असे सांप्रदायिक नामकरण केले. प्रतापसिंह राजे भोसले यांनी प्रतापराम या नावाने संतपर पदांची रचना आणि श्रीकृष्णपर पदांची रचना केली आहे. तंजावरमधील रामदासी कवी वासुदेव पंडित यांनी बोधपर पदांची रचना केली आहे. तर कवी मेघश्याम याने रामवर पद, श्रीकृष्णावर पद, श्रीकृष्णाचा पाळणा रचलेला आहे. याचबरोबर शेष कवी, अंबाजी पंडित. माधवस्वामी, पंडित राम, कवी आनंदतनय, कवी योगिनाथ, कवी रत्नाकरसुत, कवी नारायण प्रभू आदि समर्थ संप्रदायी कवींनी तंजावरात अफाट ग्रंथसंपदा निर्माण करून मराठी साहित्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
या सर्व कवींपेक्षा जास्त ग्रंथसंपदा निर्माण करणारे आणि रामदासी पंथाचा प्रचार आणी प्रसार करणारे माधवस्वामींसारखे कवी रामदासी संप्रदायात दुसरे नाही. माधवस्वामी हे तंजावरमधील समर्थांचे तिसरे शिष्य असलेल्या राघवस्वामींचे शिष्य होते. तंजावरकडील अभ्यासक आणि मठपतींच्या मते माधवस्वामी हे संत एकनाथांचे नातू होते. माधवस्वामींची ग्रंथसंपदा पुढील प्रमाणे : महाभारत टीका, ओवीबद्ध रामायण, श्लोकबद्ध रामायण, योगवासिष्ठ, भावार्थ योगवासिष्ठ, गणेश पुराण ओवीसंख्या, विष्णुपुराण, अनुगीता अध्याय, भगवद्गीता, प्रबोध चंद्रोदय नाटक, मल्लारी माहात्म्य, भीष्मस्तवराज स्तोत्र. या सर्वच ग्रंथांच्या माध्यमातून माधवस्वामी यांनी तंजावरमध्ये रामदासी संप्रदायाचा जोरदार प्रचार आणि प्रसार केला. या व्यतिरिक्त लहानमोठय़ा अशा अजून 65 रचना त्यात प्रकरणे, स्फुटश्लोक, पदरचना इत्यादी तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयाच्या सूचीत नोंदविलेल्या आहेत. जवळ जवळ पावणेदोन लक्ष ओव्यांच्या आसपास माधवस्वामींची ग्रंथरचना आहे. मात्र महाराष्ट्रातील समर्थभक्तांनी त्याची दखल घेतलेली दिसत नाही.
माधवस्वामींचे पुत्र रामपंडित यांनीही वडिलांप्रमाणे पुष्कळ ग्रंथरचना केली. एकूण 21 ग्रंथ त्यांच्या नावावर असून रामामृततरंग, त्यागराज ध्यान महात्म्य, सीतादेवीचे फळशोभण, दक्षिणामूर्ती श्लोक टीका आणि रामदिनचर्या हे पाच ग्रंथ सरस्वती महाल ग्रंथालयाने प्रकाशित केले आहेत.
समर्थ संप्रदयातील ही अफाट ग्रंथसंपदा अजूनही तंजावरमधील सरस्वती महाल ग्रंथालयाच्या कपाटात हस्तलिखिताच्या स्वरूपात बंदिस्त आहे. प्रमोद संत आणि रामचंद्र केसकर यांनी ‘कावेरी खोऱयातील समर्थ संप्रदाय’ या ग्रंथात या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. परंतु समर्थ संप्रदायातील आज अनेक ग्रंथ अप्रकाशित आहेत. मराठीच्या अभ्यासक संशोधकांनी याही विषयाकडे लक्ष देऊन मराठी साहित्याच्या इतिहासात मोलाची भर टाकावी.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.) [email protected]




























































