थोडक्यात बातम्या- एअरटेलचे पोस्टपेड प्लॅन महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांना झटका देत सर्व पोस्टपेड प्लॅनच्या किमतीत 3 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ही दरवाढ उद्या गुरुवारपासून लागू होणार आहे. पंपनीने ग्राहकांना फ्री इंटरनॅशनल रोमिंग म्हणजेच विदेश यात्रेवेळी फ्री काॅलिंग आणि इंटरनेटची भेट दिली आहे. नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दरवर्षी प्रतिसिम एक फ्री इंटरनॅशनल रोमिंग ट्रिप मिळेल.

नक्षलींचा मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली जिह्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या कारवाईत एकs 303 रायफल, दोन सिंगल शॉट रायफल, दोन गावठी पिस्तूल, एक बीजीएल लाँचर, 10 बीजीएल सेल, 21 जिवंत काडतुसे, सात डेटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली.

तेजससाठी चार इंजिने दाखल

मागील महिन्यात हिंदुस्थानला चार अत्याधुनिक एफ 404-आयएन 20 ही इंजिने सुपूर्द करण्यात आली आहेत, अशी माहिती अमेरिकेची पंपनी जीई एअरोस्पेसने दिली आहे. तेजसची चार इंजिने आल्याने आता आणखी चार विमाने बनवली जाणार असून हिंदुस्थानी हवाई दलाची ताकद वाढणार आहे.

 

कारच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

गुजरातमधील भावनगर-सोमनाथ राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. भरधाव बोलेरो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरच्या मागील बाजूस जाऊन धडकल्याने यात सात जण जागीच ठार झाले. बोलेरोमध्ये अलंग शिपयार्डचे सात कर्मचारी प्रवास करत होते. सर्वजण भावनगरहून अलंग शिपयार्डकडे जात होते.

 

13 नौदल कर्मचारी हनी ट्रपमध्ये अडकले

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने महिलांचे फेक सोशल मीडिया प्रोफाइल तयार करून हिंदुस्थानी नौदलाच्या 13 कर्मचाऱ्यांना हनी ट्रपमध्ये अडकवले आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी ‘ऑपरेशन फायरवॉल’ राबवून दहा राज्यांत धाडी टाकल्या असून 13 नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण 18 संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे.