‘कल्पना एक आविष्कार अनेक’ स्पर्धेची महाअंतिम फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती थांबली तर मानवी प्रगती थांबेल,’ या सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या विचारसूत्रावर आधारित ‘अस्तित्व’ संस्थेच्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी शुक्रवार, 9 ऑक्टोबरला माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात रंगणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक नाटय़ संस्थांनी आपापल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर एकाच सूत्राचे अनेक विविधांगी ‘आविष्कार’ रंगमंचावर साकारले आहेत. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्वच एकांकिका या मानवी प्रवृत्तीच्या, प्रगतीच्या आणि विचारस्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणाऱया आहेत.

महाअंतिम फेरीत ‘प्रश्नबंदी..?’, ‘प्रतिमांतर’, ‘यक्षप्रश्न ल्हज्त्लु’, ‘खोटं बोल नाऱया!’ आणि ‘चित्रकार’ या एकांकिका सादर होणार आहेत. हुकूमशाही व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा संघर्ष, स्त्री-पुरुष समानता, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी अस्तित्व, सत्य-असत्याचा नैतिक संघर्ष तसेच युद्ध आणि कलेची जबाबदारी अशा विविध विषयांचा वेध या एकांकिकांतून घेतला जाणार आहे. प्रयोगशील रंगभूमीला नवे आशय देणाऱया या महाअंतिम फेरीला सायंकाळी 4 वाजता सुरुवात होईल.

सर्व नाटय़प्रेमींनी आणि रसिक मायबापांनी या वैचारिक नाटय़ महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘अस्तित्व’ संस्थेतर्फे करण्यात आले आहे.