राजकीय कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना सक्ती करणे कीर्ती महाविद्यालयाला भोवले, युवासेनेच्या तक्रारीनंतर मुंबई विद्यापीठाने बजावली नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकीय व सामाजिक संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सक्ती करणे दादरच्या के. एम. डुंगरसी कीर्ती महाविद्यालयाला चांगलेच भोवले आहे. याबाबत संतप्त युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी महाविद्यालय प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला होता. तसेच मुंबई विद्यापीठाकडे कारवाईची मागणी केली होती.

विश्व हिंदू परिषद कोंकण प्रांतातर्फे षण्मुखांनद सभागृह येथे 4 ऑक्टोबर रोजी अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘ग्रँड युथ कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी महाविद्यालयाने पत्रक जारी केले होते. अनेक विद्यार्थ्यांचा अशा प्रकारच्या कार्यक्रमांना विरोध असतानाही महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी बळजबरी केली जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे केली होती. त्यानुसार युवासेनेने महाविद्यालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून तीव्र शब्दांत जाब विचारला होता. तसेच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती. वाढता दबाव आणि विद्यार्थ्यांचा विरोध पाहता महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला पाठविण्याचा निर्णय तत्काळ मागे घेतला.

आठ दिवसांत खुलासा करा

युवासेनेच्या तक्रारीनंतर कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी संलग्नता विभागाचे उपकुलसचिव हिंमत चौधरी यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार विद्यापीठाने कीर्ती महाविद्यालयाला नोटीस बजावत पुढील आठ दिवसांमध्ये लेखी खुलासा पाठविण्याच्या सूचना देत निर्धारित कालावधीत खुलासा न आल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे.