बेस्टच्या अर्थसंकल्पात 1317 कोटी रुपयांची तूट, बस ताफा 10 हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-best-bus-travel-unsafe-789-contract-drivers-booked-for-reckless-driving-in-17-months-santacruz-depot-highest-cases

बेस्ट उपक्रमाचा सन 2027-28 या वर्षाकरिताचा अर्थसंकल्प अंदाज बुधवारी बेस्ट समितीसमोर सादर करण्यात आला. बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक (अतिरिक्त भार) प्राजक्ता वर्मा यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये उपक्रमाची 1317.50 कोटी रुपयांची एकूण अंदाजित तूट दर्शवण्यात आली असून 647.79 कोटी रुपयांची तरतूद भांडवली खर्चासाठी केली आहे. तसेच बसताफा 10 हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट बेस्टने ठेवले आहे.

बेस्ट समितीची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) तथा बेस्टच्या महाव्यवस्थापक प्राजक्ता वर्मा यांनी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांच्याकडे बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प अंदाज सादर केला. त्यात बेस्ट उपक्रमाचे एकूण उत्पन्न 8,559.06 कोटी रुपये, तर एकूण खर्च 9,876.56 कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. बेस्टच्या ताफ्यात सप्टेंबरअखेरीस 2,834 बसेस असून हा बस ताफा नजीकच्या भविष्यात 10,000 बसेसपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य उपक्रमाने ठेवले आहे. यात टप्प्याटप्प्याने 4,016 बसेस उपलब्ध केल्या जाणार आहेत. यात केंद्र सरकारकडून ‘पीएम-ई-ड्राईव्ह’ अंतर्गत 1,500 मिडी इलेक्ट्रिक बसेस आणि 200 मिडी सीएनजी बसेसचा समावेश असणार आहे.

परिवहन विभागाचा तोटा 1518.71 कोटींवर

अर्थसंकल्प अंदाजानुसार, विद्युत विभागाचे उत्पन्न 5,007.51 कोटी, तर खर्च 4,806.30 कोटी रुपये आहे. दुसरीकडे परिवहन विभागाला तोटय़ाची मोठी झळ बसली आहे. परिवहन विभागाचे उत्पन्न 3,551.55 कोटी, तर खर्च 5,070.26 कोटी रुपये आहे. यावरून परिवहन विभागाचा 1518.71 कोटी रुपयांचा तोटा समोर आला आहे.

डिजिटल तिकीटिंग, आयटीएमएस प्रणाली

बेस्टच्या प्रवाशांना ‘वन तिकीट’ ऍपसह आगामी काळात फोनपे, पेटीएम, व्हॉट्सऍप, रेडबस, रॅपिडो आणि नम्मा यात्री यांसारख्या ऍप्सवरूनही बेस्ट बसचे तिकीट बुक करता येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अचूक वेळेसाठी रिअल-टाइम बस ट्रकिंग (एव्हीएलएस) आणि बसचालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे व केंद्रीय कमांड सेंटर कार्यरत केले जाणार आहे. त्याचबरोबर बसचालकांसाठी दिंडोशी येथे आधुनिक ड्रायव्हिंग सिम्युलेटर उभारले जाणार असल्याचे अर्थसंकल्प अंदाजात म्हटले आहे.