महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी 37 लाखांहून अधिक अर्ज; अर्जसंख्येत यवतमाळ जिल्हा आघाडीवर, 68 हजारांहून अधिक महिलांना प्रमाणपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून अधिकृत आणि कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 37 लाख 93 हजार 051 अर्ज प्राप्त झाले असून, 895 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन 68 हजार 436 महिला शेतकऱयांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

राज्यातील प्रत्येक पात्र महिला शेतकरी या उपक्रमाशी जोडली जावी यासाठी कृषी विभागाकडून नोंदणीला वेग देण्यात येत आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. अर्जसंख्येत यवतमाळ जिल्हा 2 लाख 53 हजार 439 अर्जांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ सातारा 2 लाख 14 हजार 787, नाशिक 2 लाख 10 हजार 327, अमरावती 2 लाख 05 हजार 074 आणि पुणे जिह्यात 1 लाख 73 हजार 049 अर्ज प्राप्त झाले आहेत. बुलढाणा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नंदुरबार, जळगाव, नांदेड, धाराशीव, धुळे, बीड आणि जालना या जिह्यांतही एक लाखाहून अधिक नोंदणी झाली आहे. तालुकानिहाय नोंदणीत कराड तालुका 35 हजार 422 नोंदणीसह आघाडीवर आहे.