
नवी मुंबईतून लक्षद्वीप बेटावर आणि गोव्यात आता हवाईमार्गे जाता येणार आहे. फ्लाय ९१ या विमान कंपनीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपली सेवा सुरू केली आहे.
या कंपनीच्या हैदराबादहून आलेल्या पहिल्याच विमानाचे नवी मुंबईत आज वॉटर कॅनने हवेत उंच पाण्याचे फवारे उडवून स्वागत केले. या कंपनीच्या माध्यमातून नवी मुंबईहून जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या चार ठिकाणी थेट विमानसेवा सुरू होणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरून देशांतर्गत हवाई सेवेत फ्लाय ९१ या विमान कंपनीची भर पडली आहे. या कंपनीचे मुख्यालय गोवा येथे आहे. फ्लाय ९१ च्या हिवाळी वेळापत्रकानुसार नवी मुंबईहून जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या चार ठिकाणी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गोवा आणि पश्चिम किनारपट्टीवरील पर्यटन व व्यावसायिक प्रवासाला चालना मिळणार आहे.
३२ लाख प्रवाशांची हवाई सफर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३२ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. सुरुवातीला १३ शहरांशी जोडणी असलेल्या विमानतळावर आता सुमारे ४३ शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. आतापर्यंत २५ हजार २९५ हून अधिक व्यावसायिक विमानफेऱ्या झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवाही या विमानतळावरून सुरू झालेली आहे.





























































