
भंडारा जिल्ह्यात दुष्काळाच्या संकटाची तीव्रता वाढत असतानाच धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील धोप येथील ५५ वर्षीय शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. सपाटे यांच्याकडे सुमारे पाच एकर शेती होती. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने त्यांच्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांपूर्वी पालकमंत्री पंकज भोयर यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान सपाटे यांनी पालकमंत्र्यांसमोर रडत आपली व्यथा मांडली होती. शेतीला पाणी मिळत नसल्याने आणि हातातोंडाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता त्यांच्या मृत्यूने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजेंद्र सपाटे यांच्याकडे पाच एकर शेती होती. यंदाच्या हंगामात चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने त्यांनी धानाची लागवड केली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळाले नाही आणि उभे पीक करपून गेले. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पंकज भोयर काही दिवसांपूर्वी परिसरात आले होते. यावेळी सपाटे यांनी पालकमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली. पिकांना पाणी मिळत नसल्याने मोठे नुकसान झाल्याचे सांगत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल उपस्थित केला होता. भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील काही भाग दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचेही सांगितले जात आहे. नुकसान झालेल्या पिकांची भरपाई, पाण्याची उपलब्धता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह याबाबत शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे. राजेंद्र सपाटे यांनी विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून, दुष्काळ आणि पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट पुन्हा ऐरणीवर आले आहे.
सपाटे यांनी पालकमंत्र्यांसमोर काही दिवसांपूर्वी आपली व्यथा मांडली होती. आपल्या भावना मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या दुष्काळ निवारण उपाययोजनांवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.



























































