
”नाना हे अजातशत्रू होते. वरून ते ओबडधोबड वाटत असले तरी ते हळव्या मनाचा संवेदनशील माणूस आणि कलाकार होते”, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या.
”माझ्या आजारपणात नाना एकमेव अशी व्यक्ती होती ते जिथे असतील तिथून एक दिवस आड मला फोन करून मला काय केलं पाहिजे ते सांगत होते. आत्मियतेने विचारपूस करायचे. व्यक्तीगत मी फार दु:खी आणि अस्वस्थ आहे” असे संजय राऊत म्हणाले.
“नानांचं शिवसेना परिवारावर विशेष प्रेम होतं. ते राहत असलेले माहिम हे शिवसेनेच्या चळवळीचे केंद्रबिंदू होते. सुरुवातीच्या काळात नाना त्या वातावरणात सामिल झाले होते. ते उत्तम आर्टीस्ट होते. जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत कलाकार म्हणून त्यांची मैत्री होती. नाना हे अजातशत्रू होते. वरून ते ओबडधोबड वाटत असले तरी ते हळव्या मनाचा संवेदनशील माणूस आणि कलाकार होते”, असे संजय राऊत म्हणाले
शिवसेनाप्रमुखांसोबतची आठवण
”नाना पाटेकर हे परखड होते. शिवसेना प्रमुखांनी एकदा पुलं देशपांडेवर टीका केली होती. त्यावर नानांनी भाष्य केलं होतं. त्यावर शिवसेनाप्रमुख चिडले होते. दुसऱ्या दिवशी नाना मातोश्रीवर आले होते, बाळासाहेबांच्या चरणाशी बसले होते. ते बाळासाहेबांना पित्यासमान मानत होते हे मी स्वत: अनुभवलेलं आहे. बाळासाहेबांच्या भूमिका आणि विचारांना नाना पाटेकरांनी आपल्या भूमिकांतून पुढे नेलेलं आहे”, अशी आठवण संजय राऊत यांनी यावेळी शेअर केली.
नानांनी आपला बोलण्याचा अधिकार कायम ठेवला
”नाना पाटेकरांमुळे महाराष्ट्र, मराठी माणूस, चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडालेली आहे. ते असामान्य व्यक्तीमत्त्व आहे. माझी आई 87 वर्षाची आहे ती देखील नानांच्या आठवणी सांगत होती. माझ्या लहान मुलीलाही नाना प्रिय आहेत. त्यामुळे नाना हे वर्षानुवर्ष आपल्या घरातला एक घटक बनून राहिलेले आहेत. नाना स्वत:ला राजकीय प्रगल्भ विचारवंत मानत होते. त्यांनी कायम आपले विचार मांडले आहेत, ते कधी गप्प बसले नाहीत. नानांना राजकारणात, समाजकारणात जे पटले नाही ते त्यांनी कायम बोलून दाखवलं आहे. इतर कलाकार, साहित्यिक जेव्हा बोलायचं असतं तेव्हा अदृश्य होतात पण तसे नाना नव्हते. आपण समाजातले घटक आहोत व त्याच्यातील घडमाोडीशी आपला संबंध आहे. त्यामुळे त्यांनी कायम त्यावर आपली मतं दिली. त्यांची मतं कुणाला पटली असतील किंवा नसतील, पण नानांनी आपला बोलण्याचा अधिकार कायम ठेवला, असेही संजय राऊत म्हणाले.
अमेरिकेतील आठवण
अमेरिकेत बृहंनमहाराष्ट्र मंडळातर्फे जागतिक मराठी संमेलन फिलाडेल्फिया येथे आयोजित केलेलं होतं. तेव्हा नाना त्याचे अध्यक्ष होते. त्या कार्यक्रमाला मी उद्धव ठाकरेंसोबत गेलो होतो. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सात आठ दिवस आम्ही खूप गमती जमती केल्या. नाना दिलखुलास माणूस होते. ते जिथे भेटतील तिथे वातावरण चिअरफुल करून टाकायचे. नाना हा समाज जीवनातला नायक होता. नाना हा हिंदी सिनेमाच्या पडद्यावरचा मराठी माणसाचा नायक होता, त्याचं व्यक्तीमत्तव कायम मराठी, रांगडं राहिलं.
नानांचा तो डायलॉग
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नानांच्या एका सिनेमाचा डायलॉग अनेकदा सभांमध्ये वापरायचे तो म्हणजे कमॉन किल मी. अनेकदा तो शिवसेनेच्या बाबतीत आम्ही वापरलाय, अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितली.


























































