
मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील (एसआयार) गडबड आणि निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात गुरुवारी बंगळुतील फ्रीडम पार्कमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने जनता न्यायालयात आयोजित करण्यात आले. या आंदोलनामुळे वातावरण चांगलेच तापले असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. यावेळी आंदोलकांना एसआयआर रद्द करा… ज्ञानेश कुमार गद्दी छोडो… अशा जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज, युट्यूबर ध्रुव राठी, अभिजित दीपके आणि सीजेपीचे इतर सदस्य सहभागी झाले होते. यावेळी प्रकाश राज यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
प्रकाश राज यांनी एसआयआर प्रक्रियेवर कडक शब्दांत टीका केली. या देशात जनता ठरवायची की सरकार कोणाचे बनणार, पण एसआयआरमुळे आता सरकार ठरवत आहे की मतदान कोण करणार. निवडणूक आयोगाने अशा प्रकारे पाऊल उचलून संपूर्ण देशाचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे, अशी टीका प्रकाश राज यांनी केली. तसेच एसआयआरमुळे देशातील 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 13 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या आदल्या दिवशी प्रकाश राज यांनी ‘सिंघम’ चित्रपटातील प्रसिद्ध संवाद म्हणत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना इशारा दिला होता. आरे आली, ज्ञानू, आता तुझी बारी आली, असे जप्रकाश राज म्हणाले होते. तसेच हे आंदोलन केवळ ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी नसून संपूर्ण एसआयआर प्रक्रिया मुळातून रद्द करण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
जिवंत लोकांना कागदोपत्री मृत दाखवले – दीपके
दरम्यान, सीजेपीच्या जनता न्यायालयात मतदार यादीतून नावे वगळण्यात आलेल्या अनेक नागरिकांनी स्वत: उपस्थित राहून आपबिती सांगितली. अनेक वर्षांपासून एकाच पत्त्यावर राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित किंवा अनुपस्थित दाखवून त्यांची नावे यादीतून हटवण्यात आल्याचे समोर आले. जे लोक जिवंत आहेत आणि येथेच राहत आहेत, त्यांना कागदोपत्री मृत किंवा अनुपस्थित दाखवले जात आहे. हा थेट लोकशाहीचा खून आहे, अशी टीका यावेळी अभिजीत दीपके यांनी केली.



























































