खरीप गेला, आता रब्बीच्या पिकाची आस! उभ्या पिकावर नाही तर पोटावरच रोटर फिरवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

तूर, सोयाबीनची पेरणी केली, पण पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाचे पीक पुरते वाया गेले. सोयाबीनला शेंगा लागल्या, पण बाजारात त्याची किंमत शून्य. परिणामी उभ्या पिकांवर नाही, तर स्वतःच्या पोटावरच रोटर फिरवावा लागत असल्याची व्यथा सोलापूर जिह्यातील शेतकऱयांनी मांडली. खरीप वाया गेला असला तरी रब्बीच्या हंगामात चमत्कार घडेल आणि दुष्काळी परिस्थितीत जगण्यापुरते तरी शेतात काहीतरी उगवेल अशी आस सोलापूर जिह्यातील शेतकरी लावून बसला आहे.

सोलापूर जिह्यात सर्वत्र सध्या भीषण परिस्थिती आहे. मध्यंतरी मुंबईत पाऊस पडला तेव्हा या भागातही थोडा पाऊस पडला आणि रोपे पुन्हा हिरवी झाली. पण शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने चाळीस दिवसांचा खंड घेतला आणि तूर, सोयाबीनचे पीक वाया गेले. सोयाबीनच्या शेंगा तर फक्त मुगाच्या आकाराच्या लागल्या. त्याला बाजारात काही किंमत नसल्याने हेक्टरी तीन हजार रुपये खर्च करून पिकावर रोटर फिरवावा लागल्याचे सोलापूरचे तरुण शेतकरी योगेश पाटील यांनी सांगितले.

उसाच्या कांड्या भरल्या नाहीत

पाण्याअभावी उसाच्या कांडय़ा भरलेल्याच नाहीत. त्यामुळे उसाच्या वजनात घट झाल्याने गाळपासाठी जाणारा ऊस कमी पडतो. परिणामी आर्थिक मोबदलाही घटतो. यंदा उसाच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे.

जनावरे सांभाळणे कठीण

दुभत्या जनावरांसाठी शेतकरी गाजर गवत लावतात. पण पाण्याअभावी गाजर गवतावरही परिणाम झाला आहे. काही शेतकऱयांनी विहिरीचे पाणी देऊन गाजर गवत राखले आहे. पण यंदा गाजर गवताचीही कमतरता जाणवणार आहे. दुभत्या जनावरांचे दुधाचे उत्पन्नही कमी होईल. अशा परिस्थितीत गोठ्यात जनावरे सांभाळणे कठीण होणार असल्याचे शेतकरी सांगतात.

पाण्याचा तुटवडा; चेन्नई–सुरत रस्त्याचे काम जोरात

पाणी कमी असल्याने बांधकामे थांबवण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. पण सोलापूरमध्ये चेन्नई-सुरत या नव्या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी मोठय़ा प्रमाणावर पाणी विकत घेतले जात आहे.

आता ज्वारीच्या पेरणीची तयारी

खरीप वाया गेल्याने रब्बीच्या हंगामात ज्वारीची पेरणी करण्याची तयारी शेतकऱयांनी सुरू केली आहे. सोलापुरात दसऱयाला ज्वारीची तर मराठवाडय़ात दिवाळीत ज्वारीची पेरणी होते. पाऊस पडला तर ज्वारीची पेरणी होईल. पावसाने जमिनीत दोन-तीन फुटांपर्यंत ओल राहिली तरी ज्वारी होईल, अशी आशा शेतकऱयांना आहे.