
‘मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱया निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..!’ म्हणत एका अनभिषिक्त नटसम्राटाने आज जगाच्या रंगभूमीवरून ‘एक्झिट’ घेतली. रसिकांचे भावविश्व समृद्ध करणारा आपला माणूस गेला! आवाजाची धग, अभिनयातील ताकद, व्यक्तिमत्त्वातील अस्सलपणा मागे ठेवून आणि समाजभानाची ज्योत पेटवून नाना गेले! नाना पाटेकर नावाच्या अवलियाने तब्बल पाच दशके आपल्या अटीशर्तीवर हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. त्यांचा ‘गमन’पासून सुरू झालेला प्रवास सर्वसामान्यांचा ‘आज की आवाज’ कधी बनला ते समजलेच नाही. हा आवाज कधी व्यवस्थेवर ‘अंकुश’ लावत सुटला, कधी अन्यायावर ‘प्रतिघात’ करताना दिसला, ‘परिंदा’ होऊन भरारी घेत ढोंगावर ‘प्रहार’करत राहिला, ‘यशवंत’ आणि ‘क्रांतिवीर’ बनून ‘अब तक छप्पन’चा हिशेब मांडू लागला. या मराठी रांगडय़ा कलाकाराच्या यशाने प्रत्येक मराठी माणूस सुखावला. हे सुख आज क्रूर नियतीने हिरावून घेतले.
‘मी आज आहे, उद्याचे कुणाला माहीत? जेवढी जमेल तेवढी सेवा करायची. शेवटी जाताना काय घेऊन जायचे आहे?’ अवघ्या चार दिवसांपूर्वी गोव्यातील दोना पावला येथील कार्यक्रमात नानाने व्यक्त केलेले विचार क्रूर नियतीने खरे केले. नाना पाटेकर यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने गोव्यात निधन झाले. मध्यरात्री 2 वाजून 30 मिनिटांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला त्यासंदर्भात मेसेज केला होता. मात्र मित्राने मेसेज पाहिला नाही. मेसेज पाहताच ते पहाटे चार वाजता नानांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिकेबरोबर वैद्यकीय पथकही आले. डॉक्टरांनी नानांना सीपीआर दिला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले.
नाना पाटेकर यांच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांचा मुलगा मल्हार याने तत्काळ गोवा गाठले. सायंकाळी नानांचे पार्थिव गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर ते एअरलिफ्ट करून पुण्यात नेण्यात आले.
मला माहितीय कधी ना कधी मला जायचंय. त्यासाठी 12 मण लाकडं लागणार आहेत, तेवढीच लागणार आहेत… हीच माझी शेवटची संपत्ती… बाळा, मी माझ्या सरणासाठी लागणारी लाकडं जमा करून ठेवलीत, ती सगळी लाकडं सुकलेली आहेत, त्यातच मला जाळायचंय, ओली लाकडं अजिबातच वापरू नका, नाहीतर खूप धूर होईल… मित्रमंडळी, शेजारीपाजारी सगळेच जमा होतील… त्यांच्या डोळय़ांत धूर जाईल, पाणी येईल त्यांच्या डोळय़ांतून… आणि माझ्या मृत्यूनंतर गैरसमज होईल की, हे सगळे माझ्यासाठीच रडतायत… कमीत कमी मी मेल्यानंतर तरी गैरसमज नकोत…
नाना पाटेकर यांनी अलीकडेच मृत्यूविषयी केलेले हे भाष्य पुन्हा व्हायरल झाले. त्यामुळे त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती की काय? असा अस्वस्थ करणारा प्रश्न चाहत्यांना पडला.
समाजभानाची ज्योत
नाना पाटेकर यांनी अभिनयासोबतच समाजभानाची ज्योतही अखंड तेवत ठेवली. शेतकरी असो किंवा सीमेवर जाऊन जवानांचे मनोबल वाढवण्याचे कार्य असो, कीर्तीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही नाना पाटेकर आपल्या मातीत घट्ट रुजलेले राहिले. दीड कोटी रुपयांची लक्झरी कार ते खरेदी करणार होते. पण गाडीची डिलिव्हरी घेण्यापूर्वी आदल्या संध्याकाळी त्यांनी शेतकरी आत्महत्येची बातमी पाहिली. हे पाहून त्यांचे मन हेलावले आणि त्यांनी गाडीचे बुकिंग रद्द करून शेतकरी कुटुंबांना मदत केली. पुढे मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना मदतीचा आधार दिला व शेतकऱ्यांचे अश्रू पुसले.
अनपेक्षित आणि धक्कादायक
‘नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. ते आपल्यातून निघून गेले यावर विश्वास बसत नाही. नानांचे जाणे महाराष्ट्रासाठी दुःखद आहे. ठाकरे परिवाराने एक प्रिय स्नेही गमावला आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
‘नाना पाटेकर यांचा वेगळा परिचय देण्याची गरज नाही. ज्या कोणाशी त्यांची भेट व्हायची, त्या प्रत्येकाला ते आपुलकीने भेटायचे. मलाही ते प्रेमाने भेटायचे. शिवसेनाप्रमुखांबद्दलही त्यांना खूप आदर होता. ते स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेत,’ असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. ‘नाना हे उत्तुंग प्रतिभेचे अभिनेते होते. मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि हिंदी सिनेमाच्या पडद्यावर त्यांनी राज्य केले. हिंदी चित्रपटसृष्टीत नाना म्हणजे मराठी अस्मिता आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. मराठी म्हणून त्यांनी आपला एक दरारा निर्माण केला होता. त्यांचे अनेक चित्रपट अविस्मरणीय ठरले. अंकुश, परिंदा, वेलकम, नटसम्राट, प्रहार अशा असंख्य चित्रपटांतील त्यांचा अभिनय गाजला. नानांचे स्मरण कायम राहील. शिवसेना परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात व्यक्त केल्या.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे येथील त्यांच्या ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसवर रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नानांचा मुलगा मल्हार याने पार्थिवाला मुखाग्नी दिला. नानांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी डोणजे येथे शोकाकुल हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. साश्रुनयनांनी नानांना अखेरचा निरोप देण्यात आला. सर्वांसाठीच हा मोठा आघात होता. या आकस्मिक एक्झिटने सारेच हळहळले.



























































