राज्य कबड्डी संघटनेवर नवा प्रशासक येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीचा पेच अद्याप कायम असून आता पुढील आठवडय़ात नव्या प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीत प्रशासक नियुक्तीबाबत पुढील आठवडय़ात निर्णय होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे.

25 ऑगस्टच्या आदेशानुसार राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक तीन महिन्यांत घेण्याची जबाबदारी हिंदुस्थानी हौशी कबड्डी महासंघावर (एकेएफआय) सोपविण्यात आली आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी निवृत्त न्यायमूर्ती पी. के. चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रशासक या पदावर कार्य करू शकत नसल्याचे राज्य संघटनेने न्यायालयाला कळविल्यानंतर याप्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत पुढील आठवडय़ात नवा प्रशासक नेमला जाणार असल्याचे कळले आहे. तोपर्यंत राज्य संघटनेच्या स्पर्धांसंबंधित कामकाज पार पाडण्याची जबाबदारी ‘एकेएफआय’कडे देण्यात आली आहे. सध्या पालघर जिह्यात 53 वी कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा सुरू झाली असून ‘एकेएफआय’ने स्पर्धेवर आपली नजर ठेवली आहे.