
मुंबई विद्यापीठाने 21 व्या फिक्की उच्च शिक्षण परिषद आणि 12 व्या उच्च शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार सोहळय़ात ‘युनिव्हर्सिटी ऑफ द इयर’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार पटकावला आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते विद्यापीठाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रिन्सिपल अजय भामरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई विद्यापीठाच्या सादरीकरण पथकाने हा सन्मान मिळवून दिला. या पथकात प्रा. स्मिता शुक्ला, प्राचार्य डॉ. श्रीवरमंगई, प्रा. मनीषा कर्णे, प्रा. बळीराम गायकवाड, डॉ. अपर्णा फडके आणि डॉ. सुशील शिंदे यांचा समावेश होता. या स्पर्धेत देशभरातील प्रमुख आयआयटी, आयआयएम, पेंद्रीय विद्यापीठे आणि राज्य विद्यापीठांचा खडतर सामना होता. अंतिम फेरीत मुंबई विद्यापीठासोबत आयआयटी गांधीनगर, बनारस हिंदू विद्यापीठ आणि चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी यांचा समावेश होता. या सर्व दिग्गज संस्थांमधून मुंबई विद्यापीठाने बाजी मारत हा ‘डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड’ आपल्या नावे केला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच विद्यापीठाला हे यश संपादन करता आले, असे नमूद करत विद्यापीठाने सर्व घटकांचे मनापासून आभार मानले आहेत.



























































