लॉटरी लागली, पैसे भरले तरी घरे मिळालीच नाहीत, तळोजातील २५० भाग्यवंत कुटुंबांची परवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉटरी लागली, घरांची शंभर टक्के रक्कम भरली तरी अद्यापपर्यंत घरे मिळाली नसल्याने तळोजातील २५० कुटुंबांची सध्या परवड सुरू आहे. सिडकोच्या तळोजा सेक्टर ३७ येथील विजयदुर्ग विस्टा प्रकल्पातील सोडत विजेत्यांना अद्याप घरांचा ताबा मिळालेला नाही. या भाग्यवतांनी डिसेंबर २०२५ मध्ये घरांची संपूर्ण किंमत भरली आहे. त्यांच्या गृहकर्जाचे हप्तेही सुरू झाले आहेत. मात्र दहा महिने झाले तरी घराचा ताबा न मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सिडकोने ऑक्टोबर २०२४ मध्ये तळोजा सेक्टर ३७ येथील अल्प उत्पन्न गटासाठी ३९८ चौरस फुटांच्या ८१६ आणि ५४० चौरस फुटांच्या आठ सदनिकांची सोडत काढली होती. ३९८ चौरस फुटांच्या सदनिकेची किंमत ३४ लाख २० हजार तर ५४० चौरस फुटांच्या सदनिकेची किंमत ४६ लाख ४० हजार रुपये होती. रेराच्या नोंदणीनुसार ऑक्टोबर २०२५ मध्ये सदनिकांचा ताबा देणे अपेक्षित होते. मात्र या भाग्यवतांनी घरांची शंभर टक्के रक्कम भरूनही त्यांना घराचा ताबा देण्यास सिडकोकडून टाळाटाळ केली जात आहे. परिणामी या कुटुंबांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

आंदोलनाच्या तयारीसाठी उद्या बैठक घेणार

सिडको प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तळोजा येथील विजयदुर्ग विस्टा या प्रकल्पातील विजेत्या अर्जदारांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. घरे बांधून तयार आहेत. पूर्ण रक्कम भरून दहा महिने उलटले तरी घराचा ताबा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी सिडकोवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची तयारी करण्यासाठी येत्या शनिवारी तळोजा येथे विजेत्या अर्जदारांची बैठक होणार आहे,, अशी माहिती अभिजित हांडे यांनी दिली आहे.

■ न्यायालयाकडून यासंदर्भात अंतिम आदेश किंवा दिशानिर्देश प्राप्त होताच सदनिकाधारकांना घराच्या ताब्यासंदर्भातील पुढील प्रक्रियेबाबत अधिकृतपणे कळवले जाणार आहे, अशी भूमिका सिडको प्रशासनाने घेतली आहे.

■ खासगी बिल्डरकडून फसवणूक होते म्हणून सिडकोच्या घरासाठी अर्ज भरला आणि लॉटरीत घरही लागले. मात्र आता जो अनुभव आला तो फार वाईट आहे. सिडकोने आमचा अंत पाहू नये, घराचा ताबा लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी विजेत्या अर्जदारांनी केली आहे.