डहाणू, तलासरीला भूकंपाचा धक्का; अनेक घरांना तडे, जिवाच्या आकांताने गावकरी घराबाहेर पळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डहाणू व तलासरी तालुक्याला आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.७ इतकी नोंदवण्यात आली. सुदैवाने कुठेही जीवितहानीची घटना घडली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू तलासरीच्या कुर्झे भागात होता. या परिसरातील अनेक घरांना तडे गेले असून जिवाच्या आकांताने शेकडो गावकऱ्यांनी घराबाहेर मोकळ्या जागेवर पळ काढला.

नोव्हेंबर २०१८ पासून तलासरी आणि डहाणू पट्ट्यात सुरू झालेल्या भूकंपाच्या मालिकेतील हा आतापर्यंतच्या तीव्र धक्क्यांपैकी एक मानला जात आहे. सायंकाळच्या वेळी तलासरी परिसरात अचानक जमीन थरथरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. काही सेकंद जाणवलेल्या या हादऱ्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. भीतीपोटी लहान मुले, महिला आणि अबालवृद्धांनी तातडीने घराबाहेर पडून मोकळ्या जागेत आसरा घेतला. घरांना तडे गेल्यामुळे आता या घरात रात्री झोपायचे कसे? अशी चिंता दुर्गम भागातील ग्रामस्थांना पडली आहे. या भूकंपामुळे परिसरात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

■ तलासरी, डहाणूतील गावांना २०१८ पासून भूकंपांचे ग्रहण लागले असून सातत्याने धक्के बसत आहेत. वैज्ञानिक परिभाषेत याला अर्थक्वेक स्वॉर्म म्हणजेच भूकंपांचा समूह म्हटले जाते. यावर्षी जुलै, ऑगस्ट आणि २६ सप्टेंबर रोजी डहाणू-तलासरी परिसरात ३.५ ते ३.६ तीव्रतेचे धक्के जाणवले होते.

■ तालुक्यातील अनेक घरांचे नुकसान झाल्याने स्थानिकांकडून तातडीने नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.