श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचे शेतकरी मदत केंद्र, दुष्काळग्रस्तांना मदत करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर शेतकरी व बागायतदारांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने श्रीवर्धन येथे ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील बाधित शेतकरी व बागायतदारांनी आपल्या अडचणी आणि मदतीसंबंधी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड लोकसभा संपर्कप्रमुख संजय कदम यांनी केले आहे.

श्रीवर्धन तालुक्यात अनेक शेतकऱ्यांकडे सलग जमीन नसून १० ते १५ गुंठ्यांपर्यंतच शेती आहे. अनेक ठिकाणी एकाच सातबारा उताऱ्यावर अनेक सहधारकांची नावे आहेत. त्यामुळे एकरावारी क्षेत्राच्या निकषांवर मदत निश्चित केल्यास प्रत्यक्ष बाधित असलेले अनेक लहान शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने तालुक्यात शेतकरी मदत केंद्र सुरू केले आहे. बाधित शेतकरी व बागायतदारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शासकीय मदतीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम या मदत केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.

तहसीलदारांना निवेदन
शेतकऱ्यांना सुलभ आणि सुरक्षित भरपाई मिळावी यासाठी या मदत कक्षाची स्थापना केली आहे. श्रीवर्धन तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर मदत कक्ष सुरू केला आहे. रायगड लोकसभा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, जिल्हा संघटक डॉ. स्विटी गिरासे, श्रीवर्धन तालुकाप्रमुख अरुण शिगवण, उपतालुकाप्रमुख सचिन गुरव, गजू भाटकर, विभागप्रमुख विनोद साळवी, गजानन कदम, उपविभागप्रमुख विजय कदम. शहर संघटक साहील यादव, उपशहरप्रमुख भोकरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष शौकत हजवाने, मिनाज दर्जी, म्हसळा तालुकाप्रमुख अरुण चाळके यांनी तहसील दार वाकळकर यांची भेट घेऊन भेटून प्रशासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत लवकरात लवकर द्यावी यासाठी निवेदन दिले.