
शेअर बाजारात गुरुवारी घसरणीचे वादळ आले. त्यातून शुक्रवारी बाजार चांगलाच सावरला आहे. भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी तेजीने दमदार कमबॅक केले आहे.त्यामुळे दलाल स्ट्रीटवर पुन्हा उत्साहाचे वातावरण आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी हल्ल्याबाबत घेतलेल्या भूमिकेतील बदलामुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी आली आहे. टीसीएसचे निकाल हे देखील या तेजीचे एक महत्त्वाचे कारण आहे.
सकाळच्या सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स ८५४ अंकांनी, म्हणजेच १.२ टक्क्यांनी वाढून ७२,४४७ अंकांवर पोहोचला, तर निफ्टी २८४ अंकांनी, म्हणजेच १.३ टक्क्यांनी वाढून २२,५१५ अंकांवर पोहोचला. सकाळी १०:३० वाजेपर्यंत, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल अंदाजे ५ लाख कोटी रुपयांनी वाढले होते. गुरुवारी बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या १० लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले होते. शुक्रवारच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला. गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान आज भरून निघाले.
बाजाराला सर्वात मोठी चालना TCS च्या निकालांमुळे मिळाली. TCS ने सप्टेंबर तिमाहीत नफ्यात १५% वाढ नोंदवत तो ₹१३,८८४ कोटींवर पोहोचल्याचे जाहीर केले, तर महसूल ११% वाढून ₹७३,१८८ कोटींवर पोहोचला. यानंतर, TCS, इन्फोसिस, HCL टेक आणि टेक महिंद्रा या सर्वांच्या शेअर्समध्ये ५% पर्यंत वाढ झाली. निफ्टी आयटी निर्देशांक ३% पेक्षा जास्त वाढला.
कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींचाही फायदा झाला. ब्रेंट क्रूड ७२ सेंट्सने, म्हणजेच ०.७% ने घसरून प्रति बॅरल १०३.५३ डॉलरवर आले. डब्ल्यूटीआय क्रूड ५२ सेंट्सने, म्हणजेच ०.६% ने घसरून प्रति बॅरल ९०.९७ डॉलरवर आले. गुरुवारी ब्रेंटमध्ये जवळपास ४% वाढ झाली होती. आपल्या देशासाठी तेलाच्या किमती महत्त्वाच्या आहेत, कारण त्याचा परिणाम आयात खर्च, रुपया आणि महागाईवर होतो.
ट्रम्प यांच्या इराणवरील विधानानेही बाजाराला आधार दिला. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितले की, तेहरानसोबत फलदायी चर्चा झाली असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून विक्रमी तेलाची वाहतूक होत आहे. त्यांनी पुढील महिन्याच्या अमेरिकन निवडणुकांपूर्वी इराणवरील नवीन हल्ले टाळण्याचे संकेत दिले. तथापि, त्यांनी असेही सांगितले की इराणी बंदरांची नौदल नाकेबंदी सुरूच राहील.



























































