मुंबई, महाराष्ट्राची भीती दिल्लीच्या राजवाटीच्या मनात बसलीय; देशभरात आणीबाणी लागू झालीय, पण भाजपमध्ये त्याविषयी बोलायची हिंमत नाही – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘या सरकारला तरुणांची भीती वाटू लागली आहे. जे आपल्या हक्कासाठी, मतदानाच्या अधिकारासाठी दिल्लीत जातायत त्यांच्यावर सरकार गुन्हे दाखल करतंय. देशभरात सध्या आणीबाणी लागू झाली आहे पण त्याविषयी बोलायची हिंमत भाजपमध्ये नाही’, अशा शब्दात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी देशभरात ज्ञानेश कुमारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांवरून सत्ताधाऱ्यांची सालटी काढली.

”या सरकारला तरुणांची भीती वाटते. सध्या देशात भाजप विरुद्ध तरुण हे चित्र आता दिसायला लागलं आहे. तरुण दिल्लीला पोहचू नये म्हणून मेट्रो, रेल्वे बंद करतायत. जे स्वत:च्या मतदानाच्या अधिकारासाठी, आपल्या हक्कासाठी दिल्लीला जात आहेत त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करताय. ही आणिबाणी नाही तर काय आहे? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

”मुंबईची, महाराष्ट्राची भीती दिल्लीच्या राजवाटीच्या मनात बसलेली आहे. मुंबई, महाराष्ट्रातून कुणीही दिल्लीला गेलं तरी गुन्हे दाखल होतायत. भाजपने देशात आणीबाणी लागू केली आहे पण त्याविषयी बोलायची हिंमत नाही. जग पाहतंय आपल्या देशात काय वातावरण आहे. आपल्या देशात लोकशाही राहिलेली नाही आणि भाजप सत्तेला चिकटून बसलीय हे जगाला आता दिसायला लागलंय”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.