
<< दिलीप ठाकूर
एखादा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यामागे एखादी अनपेक्षित गोष्ट असू शकते. चाळीस वर्षांपूर्वीची अशीच एक गोष्ट. राजेंद्रकुमार आणि कुमार गौरव हे पितापुत्र आपल्या एका व्यावसायिक कामासाठी चेन्नईला (तेव्हाचे मद्रास) गेले असता एका रात्री त्यांनी स्थानिक एकपडदा चित्रपटगृहात जाऊन एक तामीळ चित्रपट पाहायचे ठरवले. कमल हसनची अष्टपैलू भूमिका असलेल्या एका चित्रपटाला हाऊसफुल्ल गर्दी असते हे समजल्याने त्यांनी तोच चित्रपट पाहायचे ठरवले. या तामीळ चित्रपटाचे नाव ‘पुष्पक विमान’ असं असून त्यात एकही संवाद नाही अशी माहिती या पितापुत्रांना समजली होती.
चित्रपट सुरू झाला आणि हे पितापुत्र अतिशय प्रभावित झाले. या चित्रपटाचे मुंबई वितरण विभागाचे हक्क आपल्या आर्यन फिल्म या वितरण क्षेत्रासाठी विकत घ्यायचे त्यांनी लगेच ठरवले. त्यासाठी त्यांना चेन्नईतील आपला मुक्काम वाढवावा लागला. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिंगिथम श्रीनिवास राव यांची त्यांनी भेट घेतली. आणि इतरांच्याही भेटीगाठी घेतल्या. हिंदीसाठी या चित्रपटाचे नाव ‘पुष्पक’ असे ठेवले. मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात येथे हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरले आणि एक वेगळा चित्रपट हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांसमोर आला. हा चित्रपट संवादरहित असल्याने या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत गाणी अथवा संवाद यांचा वापर करण्याची संधी अजिबात नव्हती.
कमल हसनची प्रमुख भूमिका ही गोष्ट हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरली. त्याच्या अष्टपैलुत्वाचा चाहता वर्ग हिंदी चित्रपट प्रेक्षकांमध्ये होता. हा चित्रपट मेट्रो चित्रपटगृहात प्रदर्शित करताना कमल हसन हाच हुकमाचा एक्का होता. या चित्रपटाची समीक्षा, विशेष लेख प्रसिद्ध होत गेले आणि हा चित्रपट लोकप्रिय ठरला. माऊथ पब्लिसिटीने त्या लोकप्रियतेत भरच पडली. हा सर्वकालीन बहुचर्चित चित्रपट आहे. दिग्दर्शक ‘सिंगिथम श्रीनिवास राव’ हे नाव या चित्रपटाच्या यशाने हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांना माहीत झाले. दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून सिंगिथम श्रीनिवास राव यांची कन्नड, तामीळ, मल्याळम, तेलुगू या भाषांतील चित्रपटांतून वाटचाल सुरू होती. ‘नीती निजयश्री’ (1972) या तेलुगू भाषेतील चित्रपटापासून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले.
चित्रपट दिग्दर्शनात त्यांनी विविध प्रकारच्या गोष्टी पडद्यावर साकारत विविधता ठेवली. सामाजिक, कौटुंबिक, भक्तीपट असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. त्यांनी कमल हसनच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून ‘अप्पूर्व सगोवरलल’ (1989) या तामीळ चित्रपटात त्याला बुटका नायक म्हणून साकारले. कमल हसनच्या या प्रयत्नाचे तामीळनाडूतील चित्रपट समिक्षकांनी विशेष कौतुक केले, या चित्रपटाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा चित्रपट हिंदीत डब करताना त्याचे नाव ‘अप्पू राजा’ असे ठेवण्यात आले. हिंदीत तो 1990 साली प्रदर्शित झाला. ‘पुष्पक’च्या निमित्ताने सिंगिथम श्रीनिवास राव यांचा राजेंद्र कुमारशी अतिशय उत्तम परिचय झाला होता आणि त्यांनी एखादा हिंदी चित्रपट दिग्दर्शित करावा अशी राजेंद्र कुमारची असलेली इच्छा पडद्यावर यायला 1993 साल आले. याचं कारण सिंगिथम श्रीनिवास राव दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटात कमालीचे कार्यरत होते.
राजेंद्र कुमार यांच्या आर्यन फिल्म या बॅनरखाली त्यांनी आपल्यात एका तामीळ चित्रपटाची रिमेक केली आणि ‘फूल’ हा हिंदी चित्रपट तयार झाला. या चित्रपटात सुनील दत्त, राजेंद्र कुमार, कुमार गौरव आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओतील चित्रीकरणाच्या वेळी मुंबईतील आम्हा काही सिने पत्रकारांना शूटिंग रिपोर्टिंगसाठी आमंत्रित केले असता राजेंद्र कुमार यांच्या आग्रहाखातर आणि सिंगिथम श्रीनिवास राव यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली म्हणून या चित्रपटात आपण भूमिका साकारत आहोत असे माधुरी दीक्षितने सांगितले होते.
एखाद्या बहुश्रुत दिग्दर्शकाबाबतचा आदर हा असा असतो. सिंगिथम श्रीनिवास राव यांनी दिग्दर्शित केलेल्या पाच चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला हे विशेष उल्लेखनीय.


























































