वेब न्यूज – जिवंत स्नायूंवर चालणारा जलरोबोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< स्पायडरमॅन

पाण्यात पोहण्यासाठी नेहमी मोटर किंवा बॅटरीची गरज असते. मात्र अमेरिकेतील एमआयटीच्या संशोधकांनी जिवंत स्नायूंच्या पेशींच्या मदतीने चालणारा अतिशय पातळ रोबोट तयार केला आहे. या छोट्या रोबोटला प्रकाश दिल्यावर त्याच्यातील स्नायू आकुंचन पावतात आणि त्याचे पंखासारखे भाग हलू लागतात. त्यामुळे हा रोबोट पाण्यात पुढे सरकतो. विशेष म्हणजे प्रकाश कोणत्या बाजूला आणि किती वेळ दिला, यानुसार त्याची दिशा आणि वेग नियंत्रित करता येतो.

या रोबोटची रचना एका अतिशय पातळ जेलच्या थरावर करण्यात आली आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना पंखांसारखे भाग असून त्यावर जिवंत स्नायूंच्या पेशींचा थर वाढवण्यात आला आहे. या पेशी प्रकाशाला प्रतिसाद देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. संशोधकांनी पाण्याने भरलेल्या भांड्यात प्रकाशाचा स्रोत रोबोटच्या वेगवेगळ्या बाजूंना फिरवला. रोबोटने त्या प्रकाशाचा पाठलाग करत पाण्यातील छोट्या भुलभुलैयातून मार्ग काढला. त्याचा कमाल वेग एका मिनिटात स्वतःच्या शरीराच्या लांबीच्या सुमारे चारपट इतका होता.

एमआयटीच्या संशोधकांच्या मते, हा अतिशय पातळ आणि दोन भागांचा स्नायूंवर चालणारा रोबोट तयार करण्याचा पहिला प्रयोग आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या रोबोटसाठी मोठ्या प्रमाणात प्रयोगशाळेत तयार केलेल्या स्नायूंची गरज पडत होती. नव्या रचनेत स्नायूंचा अतिशय पातळ थर वापरल्यामुळे रोबोटची रचना हलकी आणि कमी गुंतागुंतीची होऊ शकते. संशोधक आता त्याचा वेग आणखी वाढवण्याच्या दिशेने काम करत आहेत.

भविष्यात अशा छोट्या रोबोटचा वापर पाण्यातील पर्यावरणाची माहिती गोळा करण्यासाठी होऊ शकतो. जिवंत स्नायू मऊ असल्यामुळे नाजूक किंवा संवेदनशील ठिकाणी काम करण्यासाठीही त्यांचा उपयोग होण्याची शक्यता आहे. सध्या हा प्रयोगशाळेतील संशोधनाचा टप्पा आहे. तरीही जिवंत पेशी आणि यंत्र यांना एकत्र आणून तयार केलेला हा रोबोट भविष्यातील जलरोबोटच्या नव्या पिढीची सुरुवात ठरू शकतो. यामुळे जलजीवन अभ्यासाच्या नव्या शक्यता निर्माण होतील. अशा यंत्रांमुळे भविष्यात पाण्यातील बदलही लक्षात येऊ शकतील.