
एमआयडीसीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असतानाही भूसंपादनाचे राजपत्र जारी केल्यामुळे वाटद मिरवणे, कळझोंडी, कोळीसरे, गडनरळ येथील ग्रामस्थांवर आपल्या जमिनी गमावण्याचे संकट आले आहे. वाडवडिलांपासून राखलेल्या जमिनी सरकारकडून हिसकावल्या जाऊ नयेत यासाठी येथील ग्रामस्थ लढा उभारण्याच्या तयारीत आहेत. सध्या शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडलेला असताना पायाखालची जमीन गमावण्याचे संकट उभे ठाकले आहे.
नुकसान भरपाईसाठी नव्हे तर भूसंपादनासाठी जमिनीचे नकाशे घेऊन महसूलचे अधिकारी गावात फिरू लागल्याने आता जमीनही हातून जाणार या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जमिनीच हिरावून घेण्याचे कारस्थान सरकारने सुरू केल्याने येथील शेतकऱ्यांनी याविरोधात लढा उभाण्याची तयारी केली आहे. सरकारने तत्काळ या राजपत्राला स्थगिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
एकच जिद्द, एमआयडीसी रद्द
कोणत्याही परिस्थितीत आमची समुद्र, खाडी, हिरवळीने नटलेली गावे एमआयडीसीच्या घशात घालू देणार नाही असा निर्धार आम्हा ग्रामस्थांचा आहे. यासाठी आम्ही पुन्हा एकदा नेटाने एमआयडीसीला विरोध करणार आहोत. एमआयडीसी आणण्यापेक्षा सरकारने येथील तरुणांना अनुदानाच्या स्वरूपात निधी उपलब्ध करून दिल्यास इथला शेतकरी स्वतःच्या बागा फुलवून फळ प्रक्रियेसारखे उद्योग स्वतः उभारेल. पण काहीही झाले तरी एमआयडीसीला आमच्या पूर्वजांनी पोटाला चिमटा काढून जपलेल्या जमिनी घेऊ देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थ संदेश बाचरे आणि मनोहर चौघुले यांनी व्यक्त केला.



























































