
कोलकाता डर्बीमध्ये ईस्ट बंगालला 1-0 ने हरवून मोहन बागान सुपर जायंट्सने आयएफए शील्डच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. गुरुवारी विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथे खेळल्या गेलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात बोस्नियन मिडफिल्डर समीर झेलकोविचने 45 व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. मोहन बागानने या एकमेव गोलसह विजयाला गवसणी घातली. या विजयासह मोहन बागानने 22 व्यांदा आयएफए शील्ड विजेतेपद पटकावले. संघाने आपल्या मागील कामगिरीनंतर जवळपास पाच दशकांनी एकाच हंगामात कोलकाता फुटबॉल लीग आणि आयएफए शील्ड ही दोन्ही विजेतेपदे जिंकण्याचा मानही मिळवला.
डय़ुरँड कपच्या पराभवाचा बदला
हा विजय मोहन बागानसाठी खास होता. कारण याच मोसमात डय़ुरँड कप फायनलमध्ये ईस्ट बंगालकडून त्यांना 4-1 ने पराभव पत्करावा लागला होता. त्या विजयानंतर आयएफए शील्ड फायनलमधील विजयाने मोहन बागानला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळाली. यावेळी मोहन बागानची कामगिरी जास्त आक्रमक नसली तरी संघाने संपूर्ण सामन्यात उत्तम नियंत्रण आणि बचावात्मक शिस्त दाखवली.



























































