2 डरपोक, 40 हजार गुलाम, लाखो शूरवीर! दिल्लीतील नाकाबंदी आणि कारवाईवरून अनुराग कश्यप यांचा सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन पुकारले आहे. शनिवार 10 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली होती, मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून दिल्लीत मोठा फौजफाटा तैनात केला आहे. अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासह युट्यूब ध्रुव राठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जंतरमंतरजवळ जमणाऱ्या आंदोलकांवरही कारवाई केली जात आहे. यामुळे दिल्लीतील वातावरण तापलेले असतानाच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आणि दिल्लीसह जंतरमंतरवर आंदोलकांवर सुरू असलेल्या पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर अनुराग कश्यप यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी, ‘दोन डरपोक, 40 हजार गुलाम, लाखो शूरवीर’ असे नमूद केले आहे. मोजक्या शब्दांतून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

दरम्यान, दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका हे एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले होते. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानातळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे महिला पोलिसांचे पथक थेट विमानामध्ये पोहोचले आणि तिथूनच तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली.

CJP Protest – अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना अटक; पोलिसांनी विमानातून घेतलं ताब्यात