
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेले सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी विमानातूनच तिघांना ताब्यात घेतले आहे. दीपके यांनी स्वत: ही कारवाई आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून लाईव्ह करत आम्हाला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
CJP Protest – अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना पोलिसांनी विमानातूनच घेतलं ताब्यात https://t.co/szDlUNQKkN
— Saamana Online (@SaamanaOnline) October 10, 2026
दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका हे मुंबईहून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले होते. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानातळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे महिला पोलिसांचे पथक थेट विमानामध्ये पोहोचले आणि तिथूनच तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या कारवाईचे दीपके यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रिमिंग केले असून ही हुकुमशाही असल्याची टीका त्यांनी केली. आपण अटक होण्यासाठी आल्याचेही ते म्हणाले. तसेच ही आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. अभिजित दीपके सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावरील कारवाईआधी युट्यूबर ध्रुव राठी यालाही गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




























































