
निवणूकांमध्ये होणारी मतचोरी आणि SIR च्या माध्यमातून सुरू असलेल्या मतदार यादीतील घोटाळ्यांच्या विरोधात देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीकडून आज जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मोदी सरकारच्या आदेशावरून पोलिसांकडून दिल्लीत चौफेर नाकेबंदी करण्यात आली आहे. यावरून सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सीजेपीच्या आंदोलनासाठी अभिजित दीपके मुंबईहून दिल्लीच्या दिशेने निघाले आहे. याचपार्श्वभूमीवर सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. यापैकी आतापर्यंत 500 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याशिवाय दिल्ली विमानतळावरही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावर बोलताना आंदोलनापूर्वी मोदींनी आपला पराभव मान्य केला असल्याची टीका केली.
Modi has accepted defeat even before our protest has begun.
The mass crackdown on protesters and the shutdown of Delhi are not signs of strength, but of a leader terrified of his own people.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 10, 2026
अभिजित दीपके यांनी पोस्टमध्ये म्हटले की, आमच्या आंदोलनाला सुरुवात होण्याआधीच मोदींनी आपला पराभव मान्य केला आहे. आंदोलकांवर होणारी ही मोठी कारवाई आणि दिल्लीची नाकाबंदी ही तुमच्या ताकदीची लक्षणे नसून, स्वतःच्याच जनतेला घाबरलेल्या एका नेत्याची ही लक्षणे आहेत, अशा शब्दात दीपके यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
दिल्लीत नाकाबंदी
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, केंद्र सरकारच्या आदेशानुसार दिल्लीत चौफेर नाकेबंदी करण्यात आली आहे. सुरक्षेचे कारण देत दिल्लीतील सर्व 57 मेट्रो स्थानकांचे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहेत, तसेच दिल्लीकडे येणाऱ्या तब्बल 37 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 24 तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असून परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि कॉलेजचे वर्ग पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतले जात आहेत.





























































