
मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावातील पाण्यात पितृ पंधरवड्यात टाकण्यात आलेले पिंडदानाचे साहित्य, पिठाचे गोळे, तेल आणि अबीर-गुलाल यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने माशांचा मृत्यू झाला होता. यानंतर पालिका प्रशासनाने खबरदारी घेत पावले उचलली आहेत. उद्या, सर्वपित्री अमावास्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाणगंगा तलावाला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. जेणेकरून तलावात कोणतेही साहित्य फेकले जाऊन जलप्रदूषण होणार नाही.
शनिवारी सर्वपित्री अमावास्येला बाणगंगेवर धार्मिक विधीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे साहित्य तलावात किंवा परिसरात टाकले जाऊ नये यासाठी पालिकेने जनजागृती सुरू केली आहे. तसेच काही उपाययोजनाही हाती घेतल्या आहेत. पिंडदान व इतर साहित्य टाकण्यासाठी पालिकेने नुकतीच दहा मोठी तर पाच लहान कृत्रिम तळी बांधली. दूषित पाण्यात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पंपांची संख्याही वाढवली आहे. यामुळे खूप फरक पडला आहे. बाणगंगा तलावातील मासे मृत होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय तलावाला चारही बाजूने बॅरिकेडिंग करण्यात आले आहे, अशी माहिती ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे यांनी दिली.






























































