
भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच्या निषेधार्थ शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.
जोपर्यंत तुषार गांधी यांना सोडले जात नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. शिवसेनेच्या आंदोलनानंतर सायंकाळी 6.45 वाजता तुषार गांधी यांची सुटका करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब, आमदार अजय चौधरी, आमदार महेश सावंत, आमदार हारून खान, आमदार अनंत (बाळा) नर, संजय सावंत उपस्थित होते.
आंदोलन दडपणाऱ्या सरकारचा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तुषार गांधी यांच्या सुटकेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशभरात आंदोलने सुरू आहेत. मात्र भाजपकडून ती दडपण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तुषार गांधी शांततापूर्ण आंदोलन करणार होते. मात्र त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आले. देशप्रेमी लोकांना अटक केली जात आहे. त्यामुळे आता ही लढाई भाजप विरुद्ध भारत अशी झाली आहे. भाजपची राजवट आता जाणार हे पक्के आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
आजपासून आम्ही सगळ्या मित्रपक्षांनी ठरवले आहे की कोणाला ताब्यात घेतले की आम्ही तिथे जाणार आहोत. आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आहोत. एकाला जरी हात लावला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला. ज्या प्रकारे देशात आंदोलने सुरू आहेत, त्यामुळे दिल्ली आता दूर नाही, असेही ते म्हणाले.






















































