दिल्लीत लॉकडाऊन! सरकारचे तरुणांविरुद्ध युद्ध; जंतरमंतरवर पाखरूही उडू शकणार नाही इतका बंदोबस्त, मोदी सरकारच्या दमनशाही विरोधात टीकेची झोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतचोरी, निवडणूक घोटाळे आणि मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात उसळलेले आंदोलन चिरडण्यासाठी मोदी सरकारने आज कहर केला. आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांना रोखण्यासाठी देशाच्या राजधानीत अक्षरशः लॉकडाऊन लावून टाकले. 15 हजार पोलिसांसह निमलष्करी दलाचे 23 हजार जवान रस्त्यावर उतरवले. दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा रद्द केल्या. दिल्लीतील बस सेवा बंद करण्यात आली. जमावबंदी लागू करण्यात आली. राजधानातील आंदोलनाचे प्रमुख स्थळ असलेल्या जंतरमंतरवर पाखरूही उडू शकणार नाही इतका बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे स्थानिकांचा कोंडमारा झाला. दैनंदिन गरजांसाठी घराबाहेर पडणेही कठीण झाले. मोदी सरकारच्या या दमनशाहीवर टीकेची झोड उठली आहे. सरकारने तरुणांविरुद्ध युद्धच पुकारल्याचा हल्ला विरोधकांनी केला आहे.

निवडणूक आयोगातील बंडाळीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मनमानी समोर आली. आयोगातील अन्य दोन आयुक्तांनी आक्षेप घेतल्यानंतरही ज्ञानेश कुमारांनी अनेक निर्णय रेटून नेले. एसआयआर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवून 13 कोटी मतदारांचा हक्क हिसकावण्यास तेच जबाबदार असल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. विद्यार्थी, तरुण आणि विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी केली. त्यासाठी दिल्लीसह मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू येथे आंदोलने करण्यात आली. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खवळलेल्या तरुणाईने सीजेपी व अन्य विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली. त्याला देशभरातून प्रतिसाद मिळू लागला. राजकीय पक्ष ठामपणे पाठीशी उभे राहिले. त्यामुळे बिथरलेल्या सरकारने आंदोलन चिरडण्याची पूर्ण तयारी केली. संपूर्ण मध्य दिल्ली बंद करून टाकली.

57 मेट्रो स्टेशन्स बंद

आंदोलकांना पोहोचताच येऊ नये यासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था करून ठेवली होती. दिल्लीतील तब्बल 57 मेट्रो स्थानकांचे गेट शुक्रवारी संध्याकाळपासूनच बंद करण्यात आले. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचीही कसून तपासणी केली जात होती. अनेक भागांतील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. दिल्ली विमानतळावरही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

’जेन–झी’ला अघोषित इमर्जन्सी मान्य होणार नाही

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘दिल्लीतील सध्या परिस्थिती युद्धासारखी आहे. आमच्या जेन-झीला ही अघोषित इमर्जन्सी कदापि मान्य होणार नाही. ही पिढी कितीतरी चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे,’ असे थरूर म्हणाले. ‘लाठी चालवण्यापेक्षा सरकारने प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. बॅरिकेड लावून निवडणूक आयोगावरचा विश्वास वाढणार नाही. आंदोलक पुन्हा दिल्लीत परतले तर पुन्हा एकदा संपूर्ण राजधानी लॉक करतील. जितक्या लवकर उत्तरे मिळतील, तितक्या लवकर आंदोलन शांत होईल’, असे थरूर म्हणाले.

सर्व आमदार–खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे काँग्रेस पक्षाचे आदेश

विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक झाली असून मोठे आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे देशभरातील सर्व आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी संध्याकाळपर्यंत सर्व आमदार-खासदार व प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीमध्ये उपस्थित राहावे, अशा सूचना पक्षनेतृत्वाने दिल्या आहेत.

सोनम वांगचूक यांचा उपोषणाचा इशारा

दिल्लीतील पोलिसी अत्याचारावर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तीव्र संताप व्यक्त केला. देशात अघोषित आणीबाणी लागू आहे. सरकारने आंदोलकांना सोडून चर्चेतून मार्ग काढायला हवा. येत्या 24 तासांत आंदोलकांची सुटका न झाल्यास मीही आंदोलनात उतरेन. उपोषण किंवा पदयात्रा काढेन, असा इशारा वांगचूक यांनी दिला आहे.

आंदोलकांवर ड्रोनद्वारे वॉच

दिल्लीत सीजेपीचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली. जंतर मंतरसह अनेक परिसरात पोलिसांनी ड्रोन तयार केले होते. या ड्रोनद्वारे कोणत्या परिसरात किती लोक जमले आहे, याची माहिती पोलीस घेत होते. तसेच आंदोलकांची धरपकड करत होते. दिल्लीतील अनेक भागांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.