पिसे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; मुख्याध्यापक, अधीक्षक, वर्गशिक्षकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिसे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विवेक भोये या ११ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक जयवंत सापळे, विवेक भोये अधीक्षक राहुल जवंजाळ आणि वर्गशिक्षक अशोक साळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवरही यापूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने विवेकच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही.

भिवंडी तालुक्यातील पिसे येथील आश्रमशाळेतील विवेक भोये या अकरा वर्षीय मुलाला खोकला व ताप येत असल्याने जवळच्या पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात येत होते. गेल्या चार दिवसांपासून विवेक आजारी असतानाही आश्रमशाळा प्रशासनाने पालकांना वेळेत माहिती दिली नाही आणि त्याच्यावर योग्य उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप विवेकची आई योगिता भोये यांनी केला आहे. या निष्काळजीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचे म्हणत त्यांनी मुख्याध्यापक, अधीक्षक आणि वर्गशिक्षक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

विवेकच्या मृत्यूमुळे संतप्त पालकांसह आदिवासी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या संघटनांनी एकत्र येऊन आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला धारेवर धरले.

विवेकच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या दोषींवर तत्काळ कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी करीत प्रकल्प कार्यालयात ठिय्या मांडला होता.

या आंदोलनाची दखल घेत प्रकल्प कार्यालयाने विवेकच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या मुख्याध्यापक जयवंत सापळे, अधीक्षक राहुल जवंजाळ आणि वर्गशिक्षक अशोक साळवे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर रात्री उशिरा शहापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला.

विवेकचे शवविच्छेदन मुंबईतील जे. जे. रुग्णालयात करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातून या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. विवेकच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात खर्डीजवळील वांगणपाडा येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.