देशात अघोषित आणीबाणीसदृश परिस्थिती; मल्लिकार्जुन खरगे यांचा हल्लाबोल, सरन्यायाधीशांची घेणार भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असून सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकशाहीची जननी असलेल्या देशाचे रूपांतर मुस्कटदाबीच्या लोकशाहीत केले आहे, अशी टीका त्यांनी केली. देशात अघोषित आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत खरगे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, देशातील सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यासाठी खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांना पत्र लिहिले आहे, तसेच मल्लिकार्जुन खरगे सोमवारी सरन्यायाधीशांची भेट घेणार आहेत. या भेटीत कोणतीही मागणी करणार नसून, केवळ देशातील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे खरगे यांनी स्पष्ट केले.

मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही हल्ला चढवला. गहमंत्री आणि पंतप्रधान देशात गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहेत. देशात अघोषित आणीबाणी लादली जात आहे. आम्ही याच गोष्टीविरुद्ध लढा देत आहोत. काल जवळपास 32 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावरूनच मोदी-शहांच्या मनात किती भीती आहे, हे दिसून येते. देशात लोकशाही शांततेत नांदावी असे त्यांना वाटत नाही, अशी टीका खरगे यांनी केली.

दिल्लीतील जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. आंदोलनस्थळी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेकडो आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईवरून खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका करत, तरुण, विद्यार्थी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटनांचे नेते, यूट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्स अशा विविध क्षेत्रांतील लोकांना सरकारला प्रश्न विचारल्यामुळे ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप केला.

संपूर्ण दिल्लीतून बॅरिकेड्स हटवा, इंटरनेट सेवा बहाल करा; लोकांना मुक्त संचार करू द्या, सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भीती आणि अस्वस्थता आज स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, अटक, ताब्यात घेणे, तुरुंगात डांबणे, लाठीमार किंवा पॅलेट गनचा वापर करून देशातील जनतेचा आवाज दाबता येणार नाही. स्वातंत्र्यलढ्यापासूनच तरुणांनी देशाचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काँग्रेस आणि संपूर्ण विरोधी पक्ष एकत्रितपणे या सरकारविरोधात संघर्ष करतील. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही रक्त सांडले असून, लोकशाही, संविधान आणि प्रत्येक देशवासियाच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढत राहू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

देशातील सद्यस्थितीबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याशी चर्चा करण्यासाठी खरगे यांनी भेटीची वेळ निश्चित केल्याचे सांगितले. या भेटीसाठी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत वेळ ठरवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. खरगे आणि राहुल गांधी यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून देशातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. या भेटीत सरन्यायाधीशांकडे कोणतीही मागणी करणार नसल्याचे खरगे यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही कोणतीही मागणी करणार नाही. हात जोडून आमची बाजू मांडू आणि देशात सध्या काय घडत आहे, याची त्यांना माहिती देऊ,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

वर्षभर शांतताभंग करणार नाही! अटी-शर्ती आणि 50 हजारांच्या जातमुचलक्यावर CJP नेत्यांची सुटका, 2 वाजता पत्रकार परिषद