
कलर पॉलिश करणाऱ्या कंपनीत अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना आज सकाळी भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीतील लक्ष्मी कंपाऊंडमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत कंपनीत काम करणारे कामगार भाजले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे-याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मी कंपाऊंडमधील कलर कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू असताना सकाळी आचानक स्फोट झाला. त्यानंतर कंपनीला भीषण आग लागली. या आगीत शहाजहान शेख, विनय कुमार वर्मा, नंदकिशोर यादव आणि नितीन कुमार हे कामगार जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी कामगारांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन जवानांनी दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. कंपनीतील पॉलिश करणाऱ्या मशीनमध्ये स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील सर्व कच्चा माल या आगीत जळून खाक झाला आहे.
वसई, विरारमध्ये तीन ठिकाणी आगडोंब
वसई-नालासोपारा, विरार आणि वालीव परिसरात आज आठ तासांमध्ये आगीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातील राम इंडस्ट्रियल हबमधील चौधरी कंपाऊंड परफ्यूम आणि कॉस्मेटिकच्या कंपनीला आग लागली. त्यानंतर विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरातील एम. एव्हेन्यूतील सहा गाळे आगीच्या विळख्यात सापडले. तिसरी घटना वालीव रोडवरील नील म बिझनेस सेंटर येथे घडली. एस. एम. स्टीलच्या दोन गाळे आगीत जळून खाक झाले.


























































