
महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामनिवासिनी, मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवी व राजवाड्यातील कराडदेवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त रविवारपासून (दि. 11) अकरा दिवस औंध येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती श्री यमाईदेवी देवस्थानच्या चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.
औंध येथे देवस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली असून, ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी मंदिर व राजवाडा परिसरातील स्वच्छता, रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाईचे काम झाले आहे. तसेच मूळपीठ डोंगरावरील पायऱ्यांची व मंदिर परिसराची स्वच्छता करण्याचे काम सुरू असून, त्याठिकाणीही मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली आहे.
रविवारी (दि. 11) राजवाड्यातील अजंठा हॉलमध्ये श्री कराडदेवीची मकरात प्रतिष्ठापना श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते केली जाणार आहे. यावेळी चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, हर्सिताराजे पंतप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुण्यहवाचन, मंत्रपुष्पांजली, महाआरती, महानैवेद्य आदी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. पुण्यहवाचन गणेशशास्त्री इंगळे व पौरोहित्यवृंद करणार आहेत.
सोमवार (दि. 12) ते रविवार (दि. 18) अखेर नियमित सकाळी व रात्री महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्याचबरोबर नवरात्रोत्सव कालावधीत दररोज सायंकाळी औंध येथील श्री यमाईदेवी मंदिरात बाल कीर्तनकार ह.भ.प. साई वैभव हरिदास यांचे व रात्री गजाननबुवा कुरोलीकर यांचे कीर्तन होणार आहे.


























































