CJP Protest – युट्यूबर ध्रुव राठी यांची सुटका; आंदोलनात सहभागी झाल्यास…, दिल्ली पोलिसांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या वतीने आयोजित आंदोलन पेटले आहे. शनिवार 10 ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरूवात झाली. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जर्मनीहून हिंदुस्थानात आलेले प्रसिद्ध युट्यूबर आणि राजकीय भाष्यकार ध्रुव राठी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान आता 24 तासांनंतर त्यांची सुटका कराण्यात आली आहे. मात्र सुटका करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना भविष्यात अशा प्रकारच्या आंदोलनांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

मूळचे हरियाणात लहानाचे मोठे झालेले आणि उच्चशिक्षणासाठी जर्मनीला गेलेले ध्रुव राठी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच युट्यूबर म्हणून लोकप्रिय झाले. केंद्र सरकार आणि भाजपच्या धोरणांवर सातत्याने टीका करताना ध्रुव राठी यांना पाहिले असेल. दरम्यान सध्या ते ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या भूमिकेला उघडपणे पाठिंबा देत आहेत. सीजेपीचे प्रमुख नेते अभिजीत दीपके आणि सौरव दास यांच्याशी असलेल्या त्यांच्या मैत्रीमुळे ते या संपूर्ण चळवळीत सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. बंगळुरू येथे 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या सीजेपीच्या आंदोलनापूर्वीच ध्रुव राठी हिंदुस्थानात दाखल झाले होते.

बंगळुरूमध्येच त्यांनी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी थेट इंडिया गेट गाठून तिथे व्हिडिओ शूट केला होता आणि मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, हे आंदोलन रोखण्यासाठी सक्रिय झालेल्या पोलिसांनी शनिवारी सकाळीच गुरुग्राम येथील त्यांच्या निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सुरुवातीला त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी माघार न घेतल्याने पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेतले.

अखेर 24 तास पूर्ण होण्याच्या आतच पोलिसांनी त्यांना सोडून दिले. पोलीस ठाण्यातून बाहेर सोडण्यापूर्वी पोलिसांकडून ध्रुव यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. जर त्यांनी पुन्हा एकदा जंतर-मंतर किंवा निदर्शनांच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.

CJP नेत्यांचीही सुटका- 

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास व आशुतोष रांका यांचीही सुमारे 24 तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलेल्या या तिघांना रविवारी दिल्ली कँट येथील एसीएम न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर विशेष न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली. अटी-शर्तींसह 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

CJP Protest – अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांची 24 तासानंतर सुटका; अटी-शर्तींसह जामीन मंजूर