Buldhana News – कॅन्सरसारख्या आजारावर मात करत 72 वर्षीय सुलोचना देशमाने करताहेत आदर्श शेती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करत वयाच्या ७२ व्या वर्षी २५ एकर शेतीचे यशस्वी व नियोजनबद्ध व्यवस्थापन करणाऱ्या रायपूर येथील सुलोचना बबनराव देशमाने यांची जीवनकहानी नारीशक्तीचा जागर करणारी आहे. कुटुंबाची जबाबदारी, शेतीचे नियोजन, शेतमजुरांची काळजी आणि सामाजिक कार्य अशा विविध आघाड्यांबर त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास नव्या पिढीतील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सुलोचना देशमाने यांचा जन्म १९५४ मध्ये झाला. नववीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९७० मध्ये त्यांचा बबनराव देशमाने यांच्याशी विवाह झाला. पत्रकारिता, शेती आणि व्यवसाय अशा विविध जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असलेल्या पतीला साथ देतानाच त्यांनी चार मुलांचे संगोपन, शिक्षण आणि विवाहाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. पतीच्या पत्रकारितेच्या व्यस्ततेमुळे वयाच्या ४५ व्या वर्षापासून त्यांनी शेतीचे संपूर्ण नियोजन आणि व्यबस्थापन स्वतःच्या हाती घेतले. तेव्हापासून आधुनिक शेतीपद्धतींचा अवलंब करत त्यांनी २५ एकर शेतीत विविध प्रयोग राबविले.

शेतीचे नियोजन स्वतःच्या हाती 

कोणते पीक घ्यायचे, बियाणे आणि खतांची निवड कशी करायची, कीडनाशकांची खरेदी, पिकांचे व्यवस्थापन आणि शेतीमालाची विक्री आदींसारख्या महत्त्वाच्या बाबी सुलोचनाबाई स्वतः पाहतात. शेतीच्या कामात त्या केवळ मार्गदर्शन करत नाहीत, तर शेतमजुरांसोबत प्रत्यक्ष शेतात उतरून कामही करतात. त्यांच्या शेतात सुमारे २५ महिला व पुरुष मजूर काम करतात. शेतमजुरांशी त्यांनी केवळ मालक आणि कामगार असे नाते न ठेवता कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत. मजुरांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे, तसेच कामाच्या वेळी दुपारचा नाश्ता आणि चहाची व्यवस्था करणे, अशा माध्यमातून त्या मजुरांची काळजी घेतात. त्यामुळे शेतमजुरांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकी आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.

दुःखाच्या डोंगरावर मात 

सुलोचनाबाईंच्या आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग आले. पाच वर्षांपूर्वी त्यांची एकुलती एक मुलगी रेखा हिचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर दुसरा मुलगा संजय याचे मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले. या दोन्ही धक्क्यांनी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातच दोन वर्षांपूर्वी सुलोचनाबाई स्वतः कॅन्सरग्रस्त झाल्या. शस्त्रक्रियेला सामोरे जात त्यांनी या आजारावर मात केली आणि पुन्हा नव्या उमेदीने शेतीच्या कामाला सुरुवात केली. वैयक्तिक आयुष्यातील दुःख आणि आजारपणामुळे खचून न जाता त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला. आजही त्या शेतातील कामकाजावर लक्ष ठेवतात आणि शेतीच्या प्रत्येक निर्णयात सक्रिय सहभाग घेतात. त्यांचा हा जिद्दीचा प्रवास संकटांवर मात करण्याची प्रेरणा देणारा आहे.

१८ जणांचे एकत्र कुटुंब जपले 

शेतीच्या जबाबदाऱ्यांसोबतच सुलोचनाबाई १८ सदस्यांच्या एकत्र कुटुंबाची धुरा सांभाळतात. कुटुंबातील प्रत्येकाच्या गरजा, अडचणी आणि सुख-दुःखात सहभागी होत त्यांनी कुटुंबातील एकोपा टिकवून ठेवला आहे. पती, मुले, सुना आणि नातवंडांना वेळोवेळी मार्गदर्शन करून कुटुंबाला एकत्र ठेवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबातील सुना शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात पुढे गेल्या. मोठी सून अर्चना राजेश देशमाने आणि तिसरी सून संध्या संदीप देशमाने यांना उच्चशिक्षण घेऊन शासकीय शिक्षिका होण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. चौथी सून सीमा सुनील देशमाने यांना गावच्या सरपंचपदाच्या जबाबदारीसाठी मार्गदर्शन करण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

शिक्षण, समाजसेवा आणि अध्यात्माची आवड 

शिक्षण आणि शेती हे सुलोचनाबाईंच्या आवडीचे विषय आहेत. नातवंडांच्या शिक्षणाकडे त्या विशेष लक्ष देतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कुटुंबातील दोन नातू आणि एक नात डॉक्टर झाले असून इतर नातवंडांचे शिक्षण सुरू आहे. शेती आणि कुटुंबापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित नाही. रायपूर गावच्या पोलीस पाटील म्हणूनही त्यांनी काम केले आहे. गावातील धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आषाढी एकादशीला दरवर्षी पंढरपूरची वारी करण्याचा नित्यक्रमही त्यांनी जपला आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी कॅन्सरवर मात करून २५ एकर शेतीचे व्यवस्थापन करणे, शेतमजुरांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपणे, १८ जणांचे एकत्र कुटुंब टिकवून ठेवणे आणि सामाजिक कार्यात सहभाग घेणे, ही सुलोचना बबनराव देशमाने यांच्या कर्तृत्वाची वैशिष्ट्ये आहेत. जिद्द, मेहनत, माणुसकी आणि कुटुंबवत्सलतेच्या बळावर त्यांनी उभा केलेला हा आदर्श नारीशक्तीचा खरा जागर असून, ग्रामीण भागातील नवतरुणींसाठी तो निश्चितच प्रेरणादायी आहे.