मजुरांना ट्रक-ट्रॅक्टरमध्ये कोंबून वाहतूक केल्यास १० हजारांचा दंड, महामार्ग पोलिसांचा कडक इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मजूर आणि प्रवाशांची ट्रक, ट्रॅक्टर तसेच बेकायदेशीर प्रवासी वाहनांतून धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांविरोधात महामार्ग वाहतूक पोलीस कठोर कारवाई करणार आहेत. अशा प्रकारांत १० हजार रुपयांचा दंड, वाहन जप्ती आणि संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा महामार्ग वाहतूक पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांनी दिला आहे. तसेच, अशा प्रकरणांत एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोहीत मतानी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नागरिकांना आणि कंत्राटदारांना हा इशारा दिला. अनेक ठिकाणी कंत्राटदार आणि इतर व्यक्ती मजुरांना ट्रक किंवा बेकायदेशीर प्रवासी वाहनांत कोंबून कामाच्या ठिकाणी घेऊन जातात. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढतो. गेल्या काही दिवसांत अशाच वाहनांचे गंभीर अपघात झाले असून, त्यात सात ते नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी नमूद केले.

सणासुदीच्या काळात विशेष खबरदारी

सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून, दुर्गा उत्सव, धम्मचक्र परिवर्तन दिन, दसरा, दिवाळी आणि अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होणार आहे. या काळात ट्रक, ट्रॅक्टर किंवा इतर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे मतानी यांनी स्पष्ट केले.

अशा धोकादायक वाहतुकीमुळे मोठे अपघात होऊ शकतात. त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो आणि त्यांच्या कुटुंबांवर मोठे संकट ओढवते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करून अशा वाहनांतून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मजुरांच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेणार नाही

कंत्राटदार मजुरांना अशा धोकादायक पद्धतीने घेऊन जाताना त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करत नाहीत, असे मतानी यांनी म्हटले. मजुरांना अशा प्रकारे प्रवास करावा लागेल आणि त्यांचा जीव धोक्यात येईल, याबाबत त्यांची संमती घेतली जातेच असे नाही. त्यामुळे कारवाईच्या वेळी संबंधित मजूर गरीब असल्याचे कारण पुढे करून नियमभंगाचे समर्थन करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकारे प्रवाशांची किंवा मजुरांची वाहतूक करणारे वाहन आढळल्यास ते जप्त करण्यात येईल, १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल आणि संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन

ट्रक, ट्रॅक्टर किंवा अन्य वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन लोहीत मतानी यांनी केले आहे. तसेच, कंत्राटदार आणि अशा प्रकारे वाहतूक करणाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करू नये. पोलिसांनी कारवाई केल्यास त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी बजावले.

प्रवाशांच्या आणि मजुरांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन अशा बेकायदेशीर वाहतुकीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चार महामार्ग वाहतूक पोलिसांनी केला आहे.