
दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) प्रस्तावित आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलनकर्त्यांशी झालेल्या कथित गैरवर्तनावरून केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरशी केली. तसेच, परिस्थिती अशीच राहिल्यास मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबरोबरच पंतप्रधान मोदी यांनाही राजीनामा द्यावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर करत दिल्लीतील पोलिसी कारवाईवर संताप व्यक्त केला. शनिवारी झालेल्या कारवाईदरम्यान तरुणी, वकील आणि पत्रकारांशी अधिकाऱ्यांनी तसेच पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला.
कल के तांडव के बाद, ऐसा ना हो कि ज्ञानेश कुमार के साथ-साथ मोदीजी का भी इस्तीफा हो जाये। https://t.co/1cb11eaOL3
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 11, 2026
“काल मोदीजींनी ज्या प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण केले, त्यातून त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. ते हिटलरलाही मागे टाकत आहेत. त्यांच्या अत्याचारांचे व्हिडिओ सर्वत्र फिरत आहेत. तरुणींवर अत्याचार केले जात आहेत आणि त्यांच्याशी गैरवर्तन होत आहे. वकील असोत किंवा पत्रकार, कोणालाही सोडले गेले नाही. परिस्थिती अशी निर्माण होऊ नये की, यावेळी ज्ञानेश कुमार यांच्याबरोबरच मोदीजींनाही राजीनामा द्यावा लागेल,” असे केजरीवाल यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. विशेष सखोल मतदार पडताळणी (SIR) प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत CJP ने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाची हाक दिली होती.























































