
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवार, आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरुवात झाली. पहाटे पारंपरिक विधीनुसार देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते मंत्रोच्चार, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषात घटस्थापना विधी पार पडला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून भाविक दाखल होत आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थान, पोलीस, नगरपरिषद, महसूल, आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम आणि राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे.
मान्यवरांची उपस्थिती
घटस्थापना सोहळ्यास आमदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, सौमय्याश्री पुजार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अर्चनाताई पाटील, मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने, पुजारी विनोद सोंजी (कदम), महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत बजाजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो आदींसह भाविक उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तिमय वातावरणात घटस्थापना; शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात https://t.co/q3NXbLaE9L
— Saamana Online (@SaamanaOnline) October 11, 2026
घटस्थापनेचे धार्मिक महत्त्व
देवीच्या गाभाऱ्यात सिंहासनाच्या डाव्या बाजूला घटाची स्थापना केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या जमिनीतील ‘वावरी’ माती घटस्थापनेसाठी आणली जाते. परंपरेनुसार तुळजापूरातील धाकटे कुंभार कुटुंबीयांकडून घटकलश आणला जातो. त्यामध्ये गोमुख व कल्लोळ तीर्थाचे पाणी भरलेले असते. शेटे कुटुंबीयांकडून सप्तधान्य अर्पण केले जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते घटाची प्रतिष्ठापना करून देवीला नागवेलीच्या पानांची पहिली माळ अर्पण केली जाते.
नऊ दिवस भक्तिमय वातावरण
नवरात्रोत्सवाच्या पुढील नऊ दिवसांत तुळजापूरनगरीत भक्तिभावाचे वातावरण राहणार आहे. विविध धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्रद्धा, अध्यात्म आणि परंपरेचा संगम असलेल्या या उत्सवासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.























































