सामना अग्रलेख – आमचे डरपोक बुद्धिजीवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात गृहयुद्ध म्हणजे अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली हे पोलीस स्टेशन बनले आहे. लहान मुलांना व मुलींना बेशरमपणे पिटले जात आहे. त्यावर एकही शब्द न बोलणारे पंतप्रधान चेन्नईत जाऊन तेथील ‘मेट्रो’चे प्रेझेंटेशन पाहत आहेत. गृहमंत्री अमित शहा पोलिसांच्या दमन शक्तीवर व जनतेच्या बंडाळीवर बोलत नाहीत, तर घरात बसून प. बंगाल, पुद्दुचेरी वगैरे राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपचा विजय झाल्याचे पेढे समाज माध्यमांवर वाटत आहेत. विजयाचे श्रेय मोदींना देत एकटेच नाचत आहेत. हा इतका बेशरमपणा या लोकांत येतो कोठून? देश जळत आहे व हुकूमशहा भूमिगत होऊन नाचत आहे! बुद्धिजीवी त्या नाच्यांच्या पायातले घुंगरू बनून ‘छम छम’ करीत आहेत. भारतरत्न, पद्मश्री, ज्ञानपीठवाल्यांनो, देश तुमची लाचारी व डरपोकपणा विसरणार नाही! सगळय़ांची नोंद झाली आहे!

कारण नसताना आंदोलकांवर दंडुक्यांचा वापर करू नका असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट बजावले असतानाही दिल्ली, मुंबईचे पोलीस मस्तवालपणे आंदोलकांना मारहाण करत आहेत. लोकांच्या एकत्र येण्यावर आणि शांततापूर्ण सत्याग्रहावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली नाही, पण अमित शहांसारख्या माफिया गृहमंत्र्याने सुप्रीम कोर्टाचे आदेश पायदळी तुडवून सत्याग्रहींविरोधात जबरी बळाचा वापर सुरू केला आहे. दिल्लीत महिला सत्याग्रही आणि महिला पत्रकारांच्या बाबतीत पोलीस निर्दयपणे वागले. त्यांच्या शरीराशी पुरुष पोलिसांनी छेडछाड केली. खासदार जॉन ब्रिटास, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एम. ए. बेबी, केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते पी. विजयन हे शांततापूर्ण पद्धतीने सत्याग्रह करत होते तेव्हा त्यांना फरफटत नेऊन प्रिझन व्हॅनमध्ये ढकलले. खासदार ब्रिटास यांना पोलिसांनी मारहाण केली. दिल्ली पोलिसांचेच भूत मुंबई पोलिसांच्या अंगात संचारले. शिवाजी पार्क परिसरात सत्याग्रह करणाऱ्या मुलांना क्रूरपणे ओढत व्हॅनमध्ये कोंबले. यात असंख्य विद्यार्थिनींचा समावेश आहे. हे असे करण्यामुळे अमित शहा एक प्रकारे पंतप्रधान मोदींविरोधात जनतेचा रोष वाढवत आहेत. स्वतःला पंतप्रधान होता येत नाही म्हणून शहा हे एक प्रकारे मोदींवर सूड घेत आहेत. तरुण मुले सत्याग्रहात उतरून हुकूमशाहीला विरोध करत असताना देशातील नामवंत उत्सवमूर्ती मात्र आपल्या सुखमय जीवनात मशगूल झाले आहेत. भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सरकारचे मिंधे झालेले

‘नटवर्य’ व ‘नटी’ मंडळ

मुलांवरील अत्याचार उघडय़ा डोळय़ांनी पाहत दमनशाहीचे समर्थन करीत आहेत. हिटलर, मुसोलिनीच्या काळातही तेथील विचारवंत, लेखक, कलाकार असेच मूग गिळून गप्प बसले होते व संतप्त जनतेने या सगळय़ा उत्सवी लोकांचा पुढे समाचार घेतला. यावर हरिशंकर परसाई यांनी चांगले विधान केले आहे. ते म्हणतात, ‘‘या देशातील बुद्धिजीवी नाममात्र वाघ आहेत, पण ते कोल्हय़ांच्या वरातीत बॅण्ड वाजवतात.’’

हे बुद्धिजीवी भारतातील परिस्थिती उघडय़ा डोळय़ांनी पाहत आहेत. नव्वद टक्के लोक सरकारच्या चमचेगिरीत धन्यता मानत आहेत. पडद्यावरील, नाटकातले नायक मोठमोठे पल्लेदार डायलॉग मारतात, पण देश संकटात असताना तोंडास चिकटपट्टी लावून बसतात. लाडक्या बहिणींप्रमाणे ते बुद्धिजीवी सरकारचे लाभार्थी असतात. त्यातील काहींचा आवाज एरवी बुलंद वगैरे होत असतो व ते परखडपणे आपली मते मांडत असतात. ते राष्ट्रभक्तिपर चित्रपटांत कामे करतात, पण सत्ताधाऱ्यांची मनमानी, झुंडशाही सुरू असताना मात्र हीच मंडळी फडणवीसांपासून मोदींपर्यंतच्या हुकूमशहांचे गुणगान करतात. त्यामुळे प्रकाश राज, नसरुद्दीन शहा, इम्रान खान, इतकेच काय, जया बच्चन यांच्यासारखे कलावंत हे अधिक राष्ट्रवादी ठरतात. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही पोलिसांच्या दंडुकेशाहीविरोधात परखड भूमिका घेऊन आपला आत्मा जिवंत असल्याचे दाखवून दिले. ज्यांना तुम्ही आम्ही ‘सेलिब्रिटी’ वगैरे मानतो ते कचकडय़ाच्या बाहुल्यांप्रमाणे निस्तेज झालेले दिसतात. आज हे लोक मोदी-फडणवीसांच्या बाजूने उभे आहेत. म्हणजे मतचोरी आणि

हुकूमशाहीचे समर्थन

करीत आहेत. उद्या सत्ताबदल होताच ते राहुल गांधीवादी किंवा उद्धव ठाकरेवादी होण्याची भीती आहे. अशा संधीसाधूंना तेव्हा आसपास फिरकू देणे म्हणजे आज जे तरुण संघर्ष करीत आहेत, पोलिसांच्या व अमित शहांच्या दमनचक्राचे बळी झाले आहेत, त्यांच्या त्यागाचा अपमान ठरेल. जे बुद्धिजीवी एका मिंधेपणाने अत्याचार पाहत आहेत ते समाजाचे शत्रू आहेत. त्यांचा देशाला व समाजाला उपयोग नाही. डरपोक व स्वार्थी लोकांची ही जमात कोणत्याच कामाची नाही. देशात गृहयुद्ध म्हणजे अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली हे पोलीस स्टेशन बनले आहे. लहान मुलांना व मुलींना बेशरमपणे पिटले जात आहे. त्यावर एकही शब्द न बोलणारे पंतप्रधान चेन्नईत जाऊन तेथील ‘मेट्रो’चे प्रेझेंटेशन पाहत आहेत, विकासावर प्रवचने झोडत आहेत. गृहमंत्री अमित शहांनी सशस्त्र पोलिसांच्या गराडय़ात स्वतःला सुरक्षित कोंडून घेतले आहे. तेही पोलिसांच्या दमन शक्तीवर व जनतेच्या बंडाळीवर बोलत नाहीत, तर घरात बसून प. बंगाल, पुद्दुचेरी वगैरे राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपचा विजय झाल्याचे पेढे समाज माध्यमांवर वाटत आहेत. विजयाचे श्रेय मोदींना देत एकटेच नाचत आहेत. हा इतका बेशरमपणा या लोकांत येतो कोठून? देश जळत आहे व हुकूमशहा भूमिगत होऊन नाचत आहे! बुद्धिजीवी त्या नाच्यांच्या पायातले घुंगरू बनून ‘छम छम’ करीत आहेत. भारतरत्न, पद्मश्री, ज्ञानपीठवाल्यांनो, देश तुमची लाचारी व डरपोकपणा विसरणार नाही! सगळय़ांची नोंद झाली आहे!