ठसा – मधू कांबीकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाना पाटेकर यांच्या निधनाच्या धक्कादायक वृत्तानंतर अवघ्या काही दिवसांतच रंगभूमी, लोककला, लावणी, दूरदर्शन मालिका आणि चित्रपट या माध्यमांत मेहनत, अष्टपैलू कारागिरी या गुणांनी आपले स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाचे वृत्त यावं हे मराठी मनोरंजन क्षेत्र आणि रसिकांसाठी दुःखदायक आहे.

प्रत्येक कलाकाराची जडणघडण ही एकसारखी नसते आणि त्यांनी कोणत्या काळात अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले हेदेखील महत्त्वाचं असतं. मधू कांबीकर यांनी सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हा मराठी चित्रपट कृष्णधवल अर्थात ब्लॅक ऍण्ड व्हाईट चित्रपटांकडून रंगीत चित्रपटांकडे जात होता. मराठी चित्रपटसृष्टीत उषा चव्हाण, उषा नाईक, आशा काळे आणि रंजना यांचा दबदबा होता. मधू कांबीकर यांनी सुरुवातीला लहानमोठय़ा भूमिकांतून आपली वाटचाल सुरू केली आणि मग आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केले. यश प्राप्त होत असताना आणि स्वतःचं स्थान निर्माण केले असतानाही त्यांनी कधीही आपल्या वागण्यात आपले वलय अथवा ग्लॅमर येऊ दिले नाही. निर्माता, दिग्दर्शक, सहकलाकार, तंत्रज्ञ, स्टुडिओतील कामगार आणि आम्ही सिनेपत्रकार अशा सगळ्यांशीच त्या सारख्याच आत्मीयतेने बोलत, वागत. दुर्दैवाने जवळपास दहा वर्षांपूर्वी म्हणजे डिसेंबर 2016 ला  ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमाच्या सादरीकरणाच्या वेळी त्या रंगमंचावर पडल्याने बेशुद्ध झाल्या होत्या. अहिल्यानगर जिह्यातील कांबी गावापासून सुरू झालेल्या प्रवासात अनेक संकटे आली तरी त्यांनी धीर न सोडता आत्मविश्वासाने परिस्थितीवर मात केली. कांबीकर यांचे वडीलही कलाकार. ते त्यांना नाटकांना घेऊन जात. त्यातून त्यांची कलावंत म्हणून जडणघडण झाली.  तमाशाच्या फडात त्यांनी पायात चाळ बांधले आणि तिथल्या परीक्षेत मात्र त्या एकेक गड सर करीत गेल्या.

आपल्या कलेवर प्रेम करत असतानाच त्यांनी आपल्या भोवतीच्या समाजाचेही भान ठेवले. लावणीबाबतचे जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून त्याद्वारे तमाशाचा इतिहास गुंफला. हे काम यशस्वी करण्यासाठी मधू कांबीकरांना त्याच्या तमाशा फडातील 11 कलाकारांनी मदत केली. या इतिहासावर आधारित असा ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम कांबीकर रंगमंचावर सादर करत. त्यांनी पुण्यातल्या बाळासाहेब भोसले यांच्याकडून कथ्थकचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. राजदत्त दिग्दर्शित आणि ट्रॉयका फिल्म कम्बाईन निर्मित ‘शापित’ चित्रपटातील अभिनयाने त्यांना अभिनेत्री म्हणून ओळख दिली. मधू कांबीकर राजदत्त यांना गुरुस्थानी मानत. महेश कोठारे दिग्दर्शित ‘झपाटलेला’मध्ये लक्ष्याच्या आईची भूमिका, त्यांची संत गाडगेबाबांच्या जीवनावरील ‘डेबू’ चित्रपटातील डेबूच्या आईची भूमिकाही लक्षवेधक ठरली. दादा कोंडके यांच्या चित्रपट संस्कृतीतही त्या एकरूप झाल्या. दादा कोंडके यांच्या ‘येऊ का घरात’, ‘ह्योच नवरा पाहिजे’, ‘मला घेऊन चला’ या चित्रपटांच्या कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओतील चित्रीकरणात त्या रमल्या. चित्रपटांबरोबरच प्रभाकर पणशीकर यांच्या ‘पुत्रकामेष्टी’ (1980) या अनिल बर्वे लिखित नाटकात त्यांनी भूमिका साकारली तेव्हा त्यांना लोककलावंत म्हणून हिणवले गेले, पण या काळात मोठय़ा हिमतीने त्यांच्या मागे प्रभाकर पणशीकर वडीलकीच्या नात्याने उभे राहिले. त्यांच्या सहकार्याने मधू कांबीकर यांनी  या नाटकातील भूमिका प्रभावीपणे साकारली. मधू कांबीकर यांनी ‘पेईंग गेस्ट’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘आकाश पेलताना’, ‘फुलवंती’ अशा 19 नाटकांमधून काम केले. त्यांनी सुरुवातीच्या काळात ‘सतीची पुण्याई’, ‘दगा’, ‘लक्ष्मी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोटय़ा छोटय़ा भूमिका केल्या. ‘बिजली’ या चित्रपटातील ग्रामीण, खेडवळ व वेठबिगार असलेल्या पुरुषाच्या पत्नीची भूमिका साकारण्यापूर्वी मधू कांबीकर यांनी  खेडय़ात जाऊन ग्रामीण स्त्राrच्या देहबोलीचा अभ्यास केला व त्या जाणिवा भूमिकेशी पडताळून पाहून मगच भूमिका साकारली. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित आणि एनएफडीसी निर्मित ‘एक होता विदूषक’ हा त्यांचा एक विशेष चित्रपट. या चित्रपटातील मधू कांबीकर यांचा अभिनय कलावंत आईचा संघर्ष मांडणारा आहे. त्यांनी ‘साद’ या गुजराती चित्रपटात काम केले. ‘रावसाहेब’, ‘आई कुलस्वामिनी तुळजाभवानी’, ‘संघर्ष जीवनाचा’ , ‘राजा पंढरीचा’ व ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘संत गाडगे महाराज’, ‘ती’ ‘बिनकामाचा नवरा’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘रणरागिणी’, ‘दुसऱया जगातली’, ‘पैज लग्नाची’, ‘अशी असावी सासू’,’ इत्यादी चित्रपटांत भूमिका साकारल्या. ‘होळी रे होळी’, ‘सर्जा राजा’, ‘वैभव’, ‘संत गाडगे महाराज’, ‘श्रावणधारा’, ‘मुक्ती’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले. त्यांनी ‘मधुप्रीतम’ (1996) नावाची संस्था स्थापन करून त्याद्वारे अभिजात पारंपरिक लावणी या लोककलेचे जतन व संवर्धन करणारा ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम सातत्याने  केला. नृत्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या नावे ‘लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठान’ची स्थापना केली. त्यांनी ‘ओमप्रीतम’ नावाची आपली निर्मिती संस्था स्थापन करून ‘काटा रुते कुणाला’ नावाच्या टेलिफिल्मची निर्मितीही केली होती. ‘मधुरंग’ हे त्यांचे त्यांच्या एकूणच प्रवासाबद्दल आत्मचरित्र बरेच काही सांगून जाते. मधू कांबीकर यांनी  कलेची सेवा अधिकाधिक विस्तृतपणे केली.

दिलीप ठाकूर

[email protected]