
मतचोरी आणि निवडणूक घोटाळ्यांचे कथित सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांना पाठीशी घालणाऱया मोदी सरकाविरोधात अवघा देश आज दिल्लीत एकवटला. निमित्त होते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या विराट मोर्चाचे. एका हातात तिरंगा आणि दुसऱया हातात सरकारविरोधी घोषणांचे फलक घेऊन हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. उन्हातान्हाची पर्वा न करता ज्येष्ठ नागरिकही मोर्चात उतरले. ‘ज्ञानेश कुमार चले जाव…’ असा एकमुखी नारा जेव्हा या विराट गर्दीने दिला, तेव्हा ज्ञानेश कुमार यांना जावेच लागणार यावर जणू शिक्कामोर्तब झाले.
ही लढाई लोकशाहीच्या रक्षणाची आहे. ती लढणे ही प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. त्यास तुफान प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक आज काढलेल्या मोर्चामध्ये सहभागी झाले. ज्यांना मोर्चात पोहोचणे शक्य नव्हते, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चाला पाठिंबा दर्शवला. लोकांनी व्हिडीओ काढून, सोशल मीडियात पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त करत समर्थन दिले.
20 हजार जवान दिल्लीतच थांबणार
विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांच्या सततच्या आंदोलनांचा मोठा धसका मोदी सरकारने घेतला आहे. आंदोलने दडपण्यासाठी राजधानीत तैनात करण्यात आलेले निमलष्करी दलाचे 20 हजार जवान दिल्लीतच तैनात राहणार आहेत. दिल्ली शहराच्या सीमा, रेल्वे स्थानके, विमानतळ, मेट्रो स्थानके व अन्य संवेदनशील ठिकाणी सर्वाधिक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
सरकारचे 200 अधिकारी माझ्या संपर्कात – राहुल गांधी
मोर्चाच्या आधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. ‘मोदी सरकारचे 200 अधिकारी माझ्या थेट संपर्कात आहेत. आम्हाला माहिती देत आहेत. ईडी, सीबीआय आणि परराष्ट्र खात्यात जे काही घडते आहे त्याची माहिती आम्हाला मिळते आहे. त्यामुळे तुम्हाला जे करायचे ते करा, सत्य आमच्या बाजूने आहे, असे आव्हानच राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिले. ‘देशाने सुरू केलेला प्रतिकार हा तात्कालिक नाही आणि तो अचानकही सुरू झालेला नाही. अनेक वर्षांपासून अनेक प्रश्न मनात खदखदत होते. पोलिसांच्या मनातही प्रश्न आहेत. त्यामुळे सरकारने कितीही अडथळे आणले तरी थांबायचे नाही. कितीही दिवस, कितीही महिने आणि कितीही वर्षे लागू द्या आम्ही मागे हटणार नाही, असे राहुल यांनी ठणकावले.
‘या’ घोषणा गाजल्या!
लोकतंत्र की हत्या का लेने हिसाब
आ गया है देशभक्तों का सैलाब
होम मिनिस्टर कायर है,
आज का जनरल डायर है
ग्यानू ग्यानू? येस पापा
व्होट काटे? येस पापा
ज्ञानू इतने में रोता है क्या…
आगे आगे देख होता है क्या
माणसांसाठी आणि मानवतेसाठी न्याय मागण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. न्याय मिळवणे हाच आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. आम्ही माणुसकीच्या नात्याने न्यायाची मागणी करत आहोत. आम्हाला न्याय हवा आहे. – ममता बॅनर्जी, माजी मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
संविधानाचे रक्षण करणे हे राजकारणापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. आम्हाला संविधानाचे रक्षण करायचे आहे आणि नागरिकांच्या मतदानाच्या संवैधानिक हक्कांचे रक्षण करायचे आहे. 13 कोटी लोकांनी त्यांच्या मतदानाचा हक्क गमावला आहे. – शशी थरूर, काँग्रेस खासदार
पोलिसांनी जंतरमंतर येथे आंदोलनाची परवानगी रद्द केली. प्रशासनाने आंदोलन रोखण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी हे आंदोलन सुरूच राहणार. सरकारने कितीही आंदोलनाची ठिकाणे बदलली तरी ते स्वतःला वाचवू शकणार नाही. – अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पार्टी
आम्ही सर्व जण लोकशाही आणि राज्यघटनेला वाचविण्यासाठी एकत्र आलो आहेत. देशाची जनता त्यांना कदापि विसरणार नाही. आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यासाठी तयार आहोत. – तेजस्वी यादव, नेते, आरजेडी
देशभरात 1 कोटी 30 लाख लोकांची नावे मतदार यादीतून काढण्यात आली आहेत. इतके लोक या देशाचे मतदारच नाहीत का? त्यांचे पुढे काय होणार? त्यांना शरणार्थी बनवून दुसऱया देशात पाठवणार का? लोकतंत्र एकतंत्रच्या दिशेने जाताना दिसत आहे. – महुआ माजी, खासदार, झामुमो



























































