
राज्यातील 34 जिह्यांमधील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येऊ नये, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी. शासनाच्या सूचनांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांची दखल घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.




























































