पंजाबमधील पोलिसावर हल्ला करणाऱ्या टोळीमागे पाकिस्तानी सूत्रधार; पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात सहभागी असलेल्या आणि पाकिस्तानी हँडलर्सच्या सांगण्यावरून कार्यरत असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश केल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. पोलिसावरील हल्ल्यानंतर पळून जाण्याचा आणि पोलीस अधिकाऱ्याचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न आरोपीने केला. यावेळी झालेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गोइंदवाल साहिब मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या एका व्यक्तीने ही टोळी उभारल्याचे अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या माहिती दिली. या व्यक्तीने मोबाईल फोनद्वारे पाकिस्तानी आयएसआय (ISI) सूत्रधारांशी पुन्हा संपर्क साधला होता. पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यासाठी आणि पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी या सूत्रधारांनी 10 लाख रुपयांची ऑफर दिल्याचे समजते.

4 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी संबंधित हे प्रकरण आहे. या घटनेत, अमृतसरमधील सरकारी रेल्वे पोलीस (GRP) ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय (ASI) सुखचैन सिंग आपल्या मोटारसायकलवरून घरी परतत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वासातच्या सुमारास, एएसआय जगदेव खुर्द गावातील त्यांच्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर होते, तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या तीन तरुणांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यापैकी एकाने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. गोळी एएसआय यांच्या डाव्या हाताला लागली, त्यानंतर त्यांना अजनाळा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.