
पंजाबच्या मानसा जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) अवैध विक्रीविरोधात लढा देणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा यांची एका मेडिकल स्टोअर चालकाने गोळ्या घालून हत्या केली आहे. ही संपूर्ण घटना परविंदर सिंग यांच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, परविंदर सिंग झोटा हे एका मेडिकल स्टोअरवर अवैधपणे अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप करत तिथे पोहोचले होते. त्यांनी फेसबुक लाईव्ह सुरू करून दुकानदाराला जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत एक वृद्ध व्यक्तीही उपस्थित होती, ज्यांनी दुकानातून औषध घेतल्याचा दावा करण्यात आला होता. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर दुकानदाराने पिस्तूल बाहेर काढले. व्हिडिओमध्ये परविंदर सिंग हे दुकानदाराला “मार मुझे, मार मुझे” असे म्हणत असल्याचे आणि पिस्तूल का वापरत आहे, असा जाब विचारत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते. सुमारे चार मिनिटे चाललेल्या या बाचाबाचीनंतर संतापलेल्या दुकानदाराने परविंदर सिंग यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गोळीबार झाल्यानंतर परविंदर सिंग यांचा मोबाईल जमिनीवर पडला आणि लाईव्ह व्हिडिओ बंद झाला. या घटनेनंतर हल्लेखोर दुकानमालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीचा तपास सुरू केला आहे. परविंदर सिंग झोटा हे मागील अनेक वर्षांपासून पंजाबमध्ये अमली पदार्थांविरोधात आणि केमिस्ट दुकानांमधील अवैध औषध विक्रीविरोधात सातत्याने आवाज उठवत होते आणि त्यांचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्सही होते.
या हत्येमुळे पंजाबमधील ड्रग्सच्या बेकायदेशीर व्यवसायाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिक तपास करत असून फरार आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.

























































