
देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारी, दुष्काळ आणि शेतकऱयांवरील संकटांकडे लक्ष देण्याऐवजी सत्ताधारी राजकीय गणिते जुळवण्यात व्यस्त आहेत. शेतकऱयांना आंदोलन करण्याची वेळ येते ही सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. शेतकऱयांना तातडीने मदत द्या, अन्यथा सरकारला खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी जनआंदोलन उभे करू, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, मनसे, वंचित बहुजन, शिवआर्मी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, छात्र भारती, भाकप यांच्या वतीने आज संगमनेर बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी शेतकऱयांच्या प्रश्नांसह लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेच्या मुद्दय़ांवर सरकारला जाब विचारला.
यावेळी चंद्रकांत खैरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशाचे वाटोळे होत असताना सत्ताधाऱयांना जनतेच्या प्रश्नांचे गांभीर्य दिसत नाही. आता जनतेने आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. हे सरकार उलथवून टाकले पाहिजे. ‘ज्ञानू’ला वाचविण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल करत ‘तो काय मोदी-शहांचा जावई आहे का?’, असा सवाल केला. सत्ताधाऱयांच्या राजकारणामुळे लोकशाही संस्थांवरील विश्वासाला धक्का बसत असल्याचा आरोपही खैरे यांनी केला. शेतकऱयांचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसल्याचा दावा करत, आंदोलनात व्यस्त असल्याचे कारण पुढे करून शेतकऱयांना मदतीपासून वंचित ठेवणे योग्य नसल्याचे खैरे यांनी यांनी सुनावले. शेतकऱयांना न्याय मिळाला नाही आणि लोकशाहीवरील प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, तर हे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही खैरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, गद्दार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरही चंद्रकांत खैरे यांनी आरोप करत टीका केली.
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते, जगदीश चौधरी, तालुकाप्रमुख अमर कतारी, जिल्हासंघटक अमोल बोऱहाडे, उपजिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, भरत मोरे, शहरप्रमुख अमित चव्हाण, नितीन नाईकवाडी, गगन हाडा, फैसल सय्यद, दिलीप साळगट, प्रकाश गायकवाड, रवींद्र कानकाटे, विजय सातपुते, अमोल डुकरे, शहरप्रमुख बाळासाहेब घोडके, कैलास गायके, अक्षय गुंजाळ, अशोक बडे, अजीज ओहरा, दत्ता ढगे आणि संकेत एखंडे, महेश नवले, अजित हसे, दिलीप नवले, प्रभाकर फाफाळे आणि नितीन नाईकवाडे, लखन भगत, मुश्ताक शेख, प्रवीण टाकसाळ, रफिक शेख, सचिन लाटे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भरत मोरे, दिलीप साळगट, महेश नवले, दत्ता ढगे अजिज ओहरा यांनीही सरकारवर जोरदार टीका केली.
‘ईव्हीएम’ऐवजी बॅलेटवरच मतदान घ्या
– मतदारयाद्यांमधील कथित घोळावरही खैरे यांनी आक्रमक भूमिका मांडली. देशातील 13 कोटी मतदारांच्या माहितीच्या कथित चोरीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून मतदारयाद्यांतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान झाले पाहिजे, अशी भूमिका मांडत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला.




























































