नालासोपाऱ्यात अग्नीतांडव! १४ मजली इमारतीला भीषण आग, दोन महिलांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नालासोपारा पूर्वेतील अचोळे परिसरात वसई-लिंक रोडवरील इंपिरियल हाइट्स या १४ मजली इमारतीला मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला असून, आगीमुळे इमारतीतील चार मजल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच रहिवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ३० ते ४० रहिवाशांची सुखरूप सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ ते साडेअकराच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आग वेगाने पसरल्याने दहाव्या मजल्यासह जवळील आणखी तीन मजल्यांनाही तिची झळ बसली. या दुर्घटनेत फाल्गुनी शाह आणि अश्विनी पारकर या दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला.

आगीची माहिती मिळताच इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली, तर काही रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी गॅलरीचा आधार घेतला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वसई-विरार तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. या मोहिमेदरम्यान सुमारे ३० ते ४० रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना शेजारील एका सभागृहात सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.

आगीची तीव्रता अधिक असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे सहा तास अथक प्रयत्न करावे लागले. अखेर जवानांना आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला महापालिका आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील याबाबत पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उंच इमारतींमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.